बारामती : महान्यूज लाईव्ह
घनश्याम केळकर
पाकिस्तानातील सियालकोटमध्ये काल ( शुक्रवारी ) मॉब लिंचिंगची एक भयानक घटना घडली, ज्यामध्ये प्रियांथा कुमार नावाच्या श्रीलंकन नागरिकाचला जमावाच्या हल्ल्यामध्ये आपला जीव गमवावा लागला. प्रियांथाने ” ईशनिंदा ” केली असल्याचा जमावाचा आरोप होता. याच आरोपातून जमावाने त्याला मारण्यात सुरवात केली, या मारहाणीतच त्याचा जागेवरच जीव गेला.
प्रियांथा कुमार हा पाकिस्तानातील सियालकोट येथे एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. त्याने ऊर्दू भाषेतील एक कागद फाडून कचऱ्याच्या टोपलीत टाकला. हा कागदवर काहीतरी इस्लामी धार्मिक मजकूर होता. यामुळे त्याने इस्लामविरोधी वर्तन केले असा कथीत आरोप त्याच्यावर लावण्यात आला. यानंतर त्याच्याच कंपनीतील कामगार याचा विरोध करण्यासाठी जमा झाले. काही वेळ शांततेत विरोध झाल्यानंतर प्रियांथावर हल्ला करून त्याला मारहाण करण्यास सुरवात झाली. जवळपास दीडशे जणांच्या या मारहाणीत त्याचा जीव गेला.
त्याचा जीव गेल्यावर त्याचे प्रेत भर रस्त्यात जाळण्यात आले. याहीपेक्षा भयानक म्हणजे या जळणाऱ्या प्रेतासमोर उभे राहून लोक सेल्फी घेत होते. सोशल मिडियावरची दृश्ये पाहून जगभरातील लोकांच्या ह्दयाचा थरकाप उडाला.
श्रीलंकेच प्रधानमंत्री महिंद्रा राजपक्षे यांनीही यावर व्टिट करून तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याबाबत योग्य कारवाई करून अपराध्यांना शिक्षा करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
पाकिस्तानातही अनेक जण या घटनेची निंदा करताना दिसत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, पाकिस्तानातील पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीही यावर दु:ख प्रकट केले आहे. सियालकोट पोलिसांनी या प्रकरणी १२० जणांना अटक केली आहे.
पाकिस्तानात घडलेली ही पहिलीच घटना नाही. पाकिस्तानात ” ईशनिंदा ” कायदा आहे. इस्लाम धर्माविरोधी व्यक्तव्य किंवा कृती केल्यास शिक्षा होते. परंतू अनेकदा लोक याचा गैरफायदा घेऊन लोकांचा बळी घेताना दिसतात. याच आरोपावरून पाकिस्तानातील एका राज्याच्या राज्यपालाला त्याच्याच शरीररक्षकाने गोळी घातली होती. या व्यक्तीला नंतर फाशी देण्यात आली. परंतू आज पाकिस्तानत त्याची मोठी कबर आहे, जी एक धार्मिक स्थळ म्हणून उदयाला आली आहे. याउलट संबंधित राज्यपालाच्या मृत्यूनंतर धार्मिक विधी करण्यासाठी येण्यास एकही मौलवी तयार नव्हता. एक मौलवींने अखेर हे सगळे विधी पार पाडले, परंतू त्याने दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान सोडून दुसऱ्या देशात पळ काढला. एवढी ईशनिंदा किंवा ब्लाप्तस्मी कायद्याची पाकिस्तानात दहशत आहे. अनेकदा या कायद्याचा गैरवापर वैयक्तिक रागलोभ पुर्ण करण्यासाठी होतो.
आताच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा पाकिस्तानची जगभर निंदा होत आहे.