बारामती : महान्यूज लाईव्ह
घनश्याम केळकर
नोव्हेंबर महिन्यात केस कापू नका आणि दाढीही करू नका ! नाही, हे कोणतेही धार्मिक व्रत नाही. पण हे सामाजिक व्रत मात्र नक्की आहे.
साऱ्या जगात ” नो शेव्ह नोव्हेंबर ” हे अभियान चालविले जाते. या महिन्यात केस कापण्यासाठी खर्च न करता ही रक्कम वाचवून एखाद्या गरजवंताला मदत केली जाते.
शाहूवाडी तालुक्यातील काही तरुण गेल्या तीन वर्षापासून ही मोहीम आपल्या परिसरात चालवितात. यावर्षी या उपक्रमातून मिळालेल्या रकमेचा धनादेश एका कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी देण्यात आला.
प्रगती फौंडेशन ही शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर-वारुण गावातील संस्था. या संस्थेचे अध्यक्ष सतीश नांगरे यांनी हा उपक्रम सुरु केला. त्यातून मागील दोन वर्षे रुग्णांना मदत देण्यात आली . यावर्षी या उपक्रमाव्दारे बारा हजार शंभर रुपये जमा झाले. या रकमेचा धनादेश सध्या कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या साहिल सुनील कांबळे या एकवीस वर्षाच्या रुग्णाच्या मदतीसाठी देण्यात आला.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशिवाय या अभियानास सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी मोठा हातभार लावला. जोतिराम पाटील, सुरेश महिंदकर, राजू वडाम, डि. बी. औताडे, विशाल विंगकर, तातोबा पाटील, मोहन महिंदकर, गौतम कांबळे, बापू यटम, विष्णू कांबळे, एम. डी. राऊत, चंद्रकांत यादव, संजय पाटील, विष्णू पाटील, हरीश कांबळे यांनीही या उपक्रमास आर्थिक मदतीचा हात दिला.