आर्णी तालुक्यातील कवठाबाजार येथील शेतकर्याची अफलातून शक्कल
यवतमाळ : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही वर्षांपासून देशात चहाची चर्चा चांगलीच रंगत आहे. कोणी गुळाचा चहा बनवते तर कोणी आल्याचा चहा फक्कड बनवते. अनेक ठिकाणी आता चहा च्या फ्रॅंचाईजी दिल्या जात आहेत. त्यातून शेकडो कोटींचा व्यवहार देखील होऊ लागला आहे. अशावेळी गावाकडचा चहा साद घालतो. पण आर्णी तालुक्यातील कवठाबाजार येथील चहा अलीकडे चांगलाच चर्चेत आला आहे. त्यासाठी कारणही तसेच आहे. कारण हा चहा स्टिलच्या भांड्यात शिजविला जात नाही. तर, चक्क कागदाच्या द्रोनमध्ये चुलीवर उकळला जातो. शेतकर्याने लढविलेली अफलातून शक्कल कौतुकास पात्र ठरली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात येणार्या आर्णी तालुक्यातील कवठाबाजार येथील अब्बास भाटी या शेतकर्याचे वास्तव्य आहे. त्याच्याकडे वडीलोपार्जीत दोन हेक्टर शेती आहे. या रब्बी हंगामात त्याने हरभरापिकाची लागवड केली. पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच शेतात जावे लागते.
थंडीचे दिवस असल्याने अंगात उष्णता निर्माण व्हावी म्हणून शेतकरी चहाचा घोट घेतात. अब्बास भाटी या शेतकर्याने चहा बनविण्यासाठी भांडेही नेले होते. परंतु, एक दिवस हे भांडे चोरीला गेले. मग रात्रीला चहा कसा बनवायचा असा प्रश्न शेतकर्याच्या डोक्यात आला. त्याने बाजूला असलेले कागद गोळा करून द्रोन बनविला.
चुलीवर पाणी, साखर, पत्ती, दूध टाकून बनवला. चहा अगदी चवदार बनला. त्याने ही बाब सकाळी आपल्या मित्रांना सांगीतली. मात्र, त्यावर कुणाचाही विश्वास बसला नाही. मग चौकात चहा बनवून दाखविला. सगळ्यांनी चहाचा घोट घेत कौतुक केले. तेव्हापासून अब्बासचा मॅजिक चहा चांगलाच चर्चेत आला आहे.
संदीप तुंबलवार या मित्राने सांगितले की, अब्बासने कागदाच्या द्रोनमध्ये चहा बनविल्याने सांगीतले. त्यावर सुरुवातीला विश्वास बसला नाही. मग चौकातच चहा बनवून दाखविला. नऊ ते दहा जणांनी चहा घेतला. चविस्ट असा चहा होता. अब्बासची दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
अब्बास भाटी यांनी सांगितले की, दोन हेक्टर शेती असून, यंदा हरभरा पिकाची लागवड केली. हिवाळ्यात रात्री पाणी देण्यासाठी जावे लागते. थंडी वाजल्यावर चहा हा हवाच असतो. मचान जवळ ठेवलेली भांडी चोरीला गेली. मग कागद गोळा करून द्रोन तयार केले. त्यात चहा बनवला. हा चहा चवदार होता. मित्रांनाही चहा बनवून पाजला.
गुजरी गावातील शिक्षक निपुण काळे म्हणाले की, या शेतकऱ्याने कागदाचा द्रोण करून चहा बनवला यात कुठल्याही प्रकारचा चमत्कार नाही. यात विज्ञान दडलेले आहे. कागद ओला झाल्याने पेट घेत नाही. गरम पाणी वर जाते आणि थंड पाणी खाली राहते, अशी ही क्रिया आहे. पाण्याला शंभर डिग्री पर्यंत तापवल्यावर उकळी येते. अर्थात केवळ ठराविक कालावधीपर्यंत ओला कागद जळत नाही.