बारामती : महान्यूज लाईव्ह
जिल्ह्यातील भीमाशंकर व्यतिरिक्त इतर कोणतेही कारखाने या एफ आरपी संदर्भात बोलत नसताना आज संध्याकाळी सोमेश्वर कारखान्याने त्यांचे मौन सोडले. सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 15 नोव्हेंबर पर्यंत गाळपास आलेल्या उसासाठी 39 कोटी 73 लाख रुपयांची रक्कम ऊस उत्पादकांच्या बॅंक खात्यात 10 डिसेंबरपर्यंत जमा होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी दिली.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची एफआरपी प्रतिटनी 2867 रुपये असून ती एकरकमी देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सोमेश्वर कारखान्याने आजअखेर 2 लाख 49 हजार 494 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, सरासरी 10.63 टक्के साखर उतारा ठेवून कारखान्याने आत्तापर्यंत 2 लाख 63 हजार 500 साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.
आत्तापर्यंत गाळप झालेल्या उसापैकी 15 नोव्हेंबर पर्यंत कारखान्याकडे 1 लाख 38 हजार 600 टन ऊस गाळपासाठी आला. या उसासाठी 39 कोटी 73 लाख रुपयांची रक्कम 10 डिसेंबरपर्यंत उत्पादकांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. ही एक रकमी एफ आर पी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च असल्याचा दावा श्री जगताप यांनी केला.
एवढेच नाही, तर तिच्या व्याजाच्या रकमेची देखील उपलब्धता सभासदांच्या बँक खात्यावर केली जाणार आहे अशी माहिती जगताप यांनी दिली. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव आणि सर्व संचालक उपस्थित होते.