माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून अधिकृत मागणी करणार असल्याचे वृत्त
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी ‘अ’ वर्गातून माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले हे इच्छुक असल्याची माहिती समोर येत असून जिल्हा बँकेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मागणी करणार असल्याचे बोलले जात आहे.
श्रीमंत ढोले यांना इंदापूर तालुक्यातून भाजप पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न होत असताना ही उमेदवारी पक्षाच्या अधिकृत कार्यकर्त्याला मिळावी ही सर्वांची इच्छा आहे असे त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. येत्या एक ते दोन दिवसात या निवडणुकीचे तालुक्यातील चित्र स्पष्ट होणार आहे.
पुणे जिल्हा बँकेसाठी ‘अ’ वर्ग गटातून प्रामुख्याने विकास सोसायटी मतदारसंघातून 13 संचालक निवडून येतात. जिल्ह्यातील 13 तालुक्यांतून प्रत्येकी एक याप्रमाणे हे उमेदवार आहेत.यातूनच श्रीमंत ढोले दावेदार असणार आहेत. ढोले यांना इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी-बावडा जिल्हा परिषद गट,शिक्षण संस्थेतील कर्मचारी तसेच लाखेवाडी, भोडणी, बोराटवाडी, निमसाखर, लाकडी, निंबोडी, कळस, डाळज, भिगवण, चिखली, म्हसोबाचीवाडी, निरगुडे, अकोले या भागातील समाज पाठीशी आहे.
त्यामुळे पुढील निवडणूक ही समाजाची वोट बँक हे गणित समोर असणार आहे. त्यामुळे ढोले यांच्या मुळे पक्षाच्या उमेदवाराला या समाजाचा नक्कीच फायदा होणार असल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद,पंचायत समिती व विधानसभा या निवडणुकीमध्ये ढोले यांची राजकीय ताकद किती असेल हे कळू शकेल.