बारामती : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी कॉंग्रेसने बारामतीकरांना वेठीस धरून विकासाचे खोटे मॉ़डेल उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. बारामती नगरपालिकेच्या निवडणूकीत नागरिकांशी संवाद साधून ही बाब पुढे आणली जाईल असे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी सांगितले.
बारामती येथील भाजपाच्या पक्षकार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नगरपालिकेची आगामी निवडणूक भाजपा पूर्ण ताकदीने लढणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.
नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण केल्याने लोकांच्या विंधनविहीरींचे पाणी संपणार आहे. यामुळे बारामतीच्या नागरिकांना नगरपालिकेच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. या सर्वांना पाणी पुरविण्याची क्षमता नसल्याने लोकांना पाण्याच्या जोडण्या मिळणार नाहीत, अशी स्थिती आहे.
आपल्या प्रभागात काय काम सुरू आहे, याची माहिती तेथील नगरसेवकांनाही नसते अशी आजची स्थिती आहे. काही ठिकाणी डांबरीकरण केलेले रस्ते खणून भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. नगरपालिका एकच व्यक्ती चालवत आहे, बाकी नगरसेवकांनाही कोणत्याही प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही असाही आरोप अविनाश मोटे यांनी केला.
स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानामध्ये बारामतीला शुन्य मार्क कसे मिळाले ? वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय केंद्र, बारामती विमानतळ, वयोश्री योजना यासाठी केंद्र सरकारने निधी दिला आहे. त्याचे श्रेय मात्र राष्ट्रवादी घेत आहे, असे भाजपा तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी सांगितले.
निरा डावा कालव्यावर बांधलेला पूल उद्घाटनापूर्वीच पाडावा लागला, हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे असे शहराध्यक्ष सतीश फाळके म्हणाले. या पत्रकार परिषदेस भाजपचे दिलीप खैरे, सुधाकर पांढरे, गोविंद देवकाते उपस्थित होते.