दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई शहरासह तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस सूरु असून या पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान केले आहे. तसेच कृष्णा नदीवर बांधन्यात आलेल्या तात्पुरत्या स्वरुपातील पुलाचा भरावच वाहून गेल्याने वाहतूकीची समस्या निर्माण झाली आहे.
गेले दोन दिवसापासून ढगाळ वातावरण झाले होते. काल सकाळ पासुनच रिमझिम पावसास सुरुवात झाली. तर रात्री मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले. रात्रभर सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे हरभरा, गहू, स्ट्रॉबेरी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
शेतामध्ये पाण्याचे डोह साचल्यामुळे पिके जमीनदोस्त झाली आहेत. अगोदरच कोेरोना महामारीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे या अवकाळी पावसाने मोडले आहे. संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शासकीय मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा नदीस पूर आला होता. कृष्णा नदीवरील मोठा पूल पाडल्यामुळे पर्यायी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला पूलाचा भराव या पुरात वाहून गेला. यामुळे मधल्या पुलावरून संपूर्ण वाहनांची वर्दळ सुरू झाल्याने वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे.
नुकत्याच प्राथमिक शाळा चालू झाल्याने या अवकाळी पावसामुळे पालकांची पाल्यांना शाळेत सोडताना त्रेधा उडाली. दुसरीकडे शहरातील गटारे तुडुंब भरून पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत आहेत, त्यातूनच पादचारी व वाहनचालक मार्ग काढताना दिसत होते.