मुंबई : महान्यूज लाईव्ह
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनावरही ( ओमायक्रॉन ) या कोरोनाच्या नवा व्हेरियंटचं सावट घोघावतंय. या पार्श्वभूमीवर देशातील आणि राज्यातील आंबेडकरी अनुयायांनी येत्या 6 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येऊ नये. घरातुनच बाबासाहेबांना अभिवादन करा असं आवाहन दस्तूरखुद्द बाबासाहेबांचे वंशज आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जावं की नाही, यावरून शेकडो अनुयायांकडून प्रश्र्न उपस्थित केले जात आहेत. तर काही संघटनांनी 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर येण्याचा निर्णय घेतला जात आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यंदाच्या महापरिनिर्वान दिनी हा आपापल्या घरीच महामानवाला अभिवादन करण्याचं आवाहन केले आहे.
याबाबत आंबेडकर म्हणाले, 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईला यावं की नाही? अशी विचारणा केली जात आहे. सध्या रेल्वे पूर्णपणे चालू झालेली नाही. एसटीचा ही संप सुरू आहे. सोबतच कोरोनाच्या नव्या variant बद्दल अंदाज कोणालाही येत नाही. अशा परिस्थितीत आपण येणं टाळावं असं माझं आवाहन आहे.
आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम करूया. सोबतच आंबेडकरवादी राजकीय पक्षालाच आम्ही तारण्याचं काम करू आणि आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करु हा संकल्प सगळ्यांनी करू या. दरम्यान, राज्य शासनासोबतच मुंबई महापालिकेनंही यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी बाबासाहेबांना आपापल्या घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन केले आहे.
तसेच चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकात आदरांजली वाहण्यासाठी येणारे नेतेमंडळी आणि मान्यवरांनीही लशीचे दोन डोस घेतलेले असावेत असे बंधनकारक करण्यात आले आहे. जर जवळ लस प्रमाणपत्र नसेल तर अशा मान्यवरांना परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. राज्य सरकारने यंदाच्या ६ डिसेंबर, या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या सूचनांनुसार, दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात कोणतेही स्टॉल्स लावता येणार नाहीत.
दरवर्षी 6 डिसेंबर रोजी दादरच्या चैत्यभूमीवर महामानवास अभिवादन लाखोंचा जनसमुदाय लोटतो. पण कोरोनाची विषाणू आल्यापासून महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादनावर काही मर्यादा आल्यात. यंदाही शासनाने पूर्ण बंदी घातलेली नाही, पण कोरोनाच्या लसीचं प्रमाणपत्र बाळगणं मात्र अनिवार्य केलं आहे.