पुणे : महान्यूज लाईव्ह
एकीकडे अवकाळी पाऊस राज्यातील शेतीला आपत्ती ठरला असून, दुसरीकडे धरण क्षेत्रांसाठी मात्र ही आपत्ती इष्टापत्ती ठरली आहे. त्यामुळेच उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी उजनीमध्ये 90 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे अचानक वाढलेल्या साठ्यामुळे धरणाच्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दर वर्षी उजनी धरण केव्हा भरते, याकडे सर्वांचे लक्ष असते, मात्र हिवाळा सुरू झाला की, उजनी धरणाचा साठा झपाट्याने खालावत जातो. गेल्या वीस वर्षातील ही पहिली घटना आहे की, ज्यावेळी डिसेंबर महिन्यामध्ये उजनी धरण साठ्यामध्ये पाणी कमतरता होण्याऐवजी वाढले आहे. धरण पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या साठ्यातून नदीतून पाणी सोडण्याची वेळ उजनी धरण व्यवस्थापनावर आली आहे.
यामुळे धरणसाठ्यातून केव्हाही पाणी सोडावे लागणार असल्याने उजनी धरणाच्या काठच्या गावांना व लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग केव्हाही सोडण्यात येऊ शकतो, असा इशारा उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिला आहे.