खंडाळा : महान्यूज लाईव्ह
सातारा जिल्ह्यातील सालपे (ता .फलटण) येथील एसटी थांब्याजवळ किरकोळ कारणावरुन एकाचा लाकडी दांडक्याने दोघा भावांनी बेदम मारहाण करुन शेतमजूराचा खून केल्याने लोणंद परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये लाकडी दांडक्याने मारहाण करीत खून करणारे संशयित दोघे भाऊ घटनास्थळावरुन फरार झाले असून शोधकार्यासाठी लोणंद पोलीसांचे विविध ठिकाणी पथके रवाना झाली आहेत.
या घटनेमध्ये बापू संभाजी निकम (वय 38, रा. शेरेचीवाडी(हिं) ) असे खून झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. याबाबतची लोणंद पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत सालपे गावाच्या हद्दीमधील एस. टी. बस थांब्याजवळ बापू निकम हे काही कामानिमित्त थांबले होते.
दरम्यान, त्याठिकाणी किरकोळ कारणावरुन बापू निकम यांचे व सौरभ संजय जगताप, गौरव संजय जगताप (दोघे रा. सालपे ता.फलटण) या भावांबरोबर वादावादी झाली. सौरभ जगताप, गौरव जगताप यांनी बापू निकम यांना रागातून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये बापू निकम यांच्या वर्मी घाव लागल्याने गंभीर जखमी होत जागीच ठार झाले.
यावेळी घटनास्थळावरुन सौरभ जगताप व गौरव जगताप याबंधूंनी पलायन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणंद पोलीसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी व लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस अंमलदार महेश संपकाळ, लोणंद पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.
यावेळी मृत बापू निकम यांचा मृतदेह शवविच्छेदन लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करीत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला झाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बो-हाडे, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करीत आहेत.