माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
दिवाळीचा सण संपतानाच हळूहळू थंडी वाढत असतानाच अवकाळी पाऊस आणि त्यात थंड धुक्याची चादर यामुळे भोर तालुक्यात हुडहुडी भरली आहे. बाजारात स्वेटर, शाल, कानटोपी या उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी ठिकठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे.
अवकाळी पाऊस आणि गार वाऱ्यामुळे जिल्ह्यासह थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही थंडीपासून संरक्षण करणारे तिबेटीयन स्वेटर, गुलाबी, आकाशी, लाल असे विविध स्वेटर आकर्षक डिझाइनमध्ये असलेल्या व्हरायटीला मागणी वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून थंड वातावरणामुळे जवळपास अनेक वर्षानंतर अशाप्रकारे कडाक्याची थंडी पडली असल्याचे जाणकार सांगत असून नसरापूर ( ता. भोर ) पंचक्रोशीतील ग्राहक स्वेटर, शाल, कानटोप्या खरेदी करण्यास गर्दी करताना दिसत आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून स्वेटर खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. परंतु यंदा अवकाळी पावसाचा ताडखा आणि कडाक्याची थंडी पडल्याने ग्राहकांचा स्वेटर खरेदीसाठी ओढा वाढला आहे. दिल्ली, काश्मीर यांसारख्या विविध ठिकाणाच्या स्वेटरला मागणी आहे. मात्र ते मिळत नसल्याने शहराच्या ठिकाणी ग्राहकांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.
यंदा स्वेटरचे भावही २० टक्क्यांने वाढले असले तरी उत्साहानं ग्राहक स्वेटर खरेदी करत आहेत. यंदा स्वेटरमध्ये स्वेटशर्ट हुडी, झिपर, कार्डिगन, लोकरीचं स्वेटर, यांसारखे विविध प्रकार बाजारात आले असून यांची किंमत ३५० ते ६०० पर्यंत आहे. त्याशिवाय नसरापूर बाजारात मंकी कॅप, लोकरीची कानटोपी, पॉप-पॉम हॅट, रिब-नाईट हॅट, यांसारखे विविध कानटोपीचे प्रकार बाजारात उपलब्ध होत आहेत. लहान मुलांसाठीही ट्रेंडी स्वेटरला पालक वर्गातून मागणी वाढत आहे.