दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील यवत परिसरातील घिगेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घुसून एका मद्यपीने शाळेत गोंधळ घातला. त्यास मज्जाव करण्यासाठी गेलेल्या मुख्याध्यापकावर या मद्यपीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, या मद्यपीला यवत पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
डिसेंबर महिन्याच्या एक तारखेपासून राज्यातील जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होऊन एकच दिवस झाला असताना दुसऱ्याच दिवशी दौंड तालुक्यातील यवत परिसरातील घिगेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा सुरू असताना एका मद्यपी व्यक्तीने शाळेत घुसून शिवीगाळ करीत धिंगाणा घातला आहे. या मद्यपीला मज्जाव करण्यासाठी गेलेले शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अशोक मानसिंग पवार यांना या संबंधित व्यक्तीने धक्काबुकी आणि मारहाण केली आहे. या मारहाणीत मुख्याध्यपक पवार यांना मानेवरती गंभीर मार लागला आहे.
याबाबत मुख्याध्यापक अशोक पवार यांनी यवत पोलीसांना ही माहिती कळविल्याने यवत पोलीसांनी संबंधित मद्यपी व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
दरम्यान, मुख्याध्यापक अशोक मानसिंग पवार हे दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुका संघटक आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिक्षक संघटनेने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.