माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २ – भोर, वेल्हा, मुळशी, हवेली या सह्याद्रीच्या खोऱ्यात बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भागात गारपीट झाल्याने शेतातील भातपीक, हरभरा, ज्वारी, गहू पिकांचे कांदा आणि भाजीपाला पिंकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हाताशी आलेला घास हिरावला असल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
सह्याद्रीच्या खोऱ्यात वेगवेगळ्या भागात बुधवार आणि गुरुवार दिवसभर झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. जोरदार अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतातील भातपीक, हरभरा, ज्वारी, गहू, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
अवकाळी पावसाचा फटका भोर, वेल्हा, मुळशी, हवेली तालुक्यात अधिक प्रमाणात बसला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन थंडीच्या काळात असतानाही अवकाळी पाऊस सुरुच असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
बुधवारी सकाळपासूनच सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात गुरूवारी पहाटेपर्यंत बरसत होता. अनेक ठिकाणी गारपीट झाली. दरम्यान, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी मध्यरात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला. गहू, ज्वारी, हरबरा या पिकांसह टोमॅटो फळांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
रब्बी पिकांचा हंगाम संपत आला असतनाच अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने राज्य सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्यावा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघाचे शामसुंदर जायगुडे यांनी केली आहे.
भोर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे पिकांचे नुकसानीचे पाहणी करून त्वरीत पंचनामे शासनाने करण्याची मागणी भोर तालुका भाजपचे पदाधिकारी बाळासाहेब गरुड, तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, विश्वास ननावरे, विनोद चौधरी, सुनिल पांगारे, निलेश कोंडे आदींनी केली.
अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सो यांनी नुकसान भरपाई बाबत पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे झालेल्या पिकांचे नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्याचे महसूल कर्मचारी यांना सूचना दिल्या आहेत.
– सचिन पाटील, तहसीलदार भोर