महान्यूज वेदर अपडेट
ऐन थंडीच्या काळात काही दिवसांपासून जो पाऊस पडतो आहे, तो पाऊस गेल्या पाच वर्षानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पडत आहे. हा पाऊस संपूर्ण देशभरात पडत असून तिरुपती बालाजी येथील मुसळधार पावसानंतर महाराष्ट्रातही पावसाने थैमान घातले आहे. पश्चिम भागातील वातावरणाच्या डिस्टर्बन्स मुळे हा पाऊस पडत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली असून, देशातील हवामान बदलत असल्याने भूमध्य समुद्र पासून लाल समुद्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे या दाबामुळे समुद्रातल्या आर्द्रतेसोबत हवा फिरते आणि त्यातून हा डिस्टर्बन्स तयार होतो.
दरम्यान अजून दोन दिवस हा पाऊस होणार असून आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पावसामुळे थंडीची लाट येऊ शकते, अथवा दाट धुके पडू शकते आणि काही दिवस अशी परिस्थिती कायम राहू शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 2 व 3 डिसेंबर दरम्यान हा पाऊस राहण्याची शक्यता असल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात ही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आज व उद्या मुसळधार पावसाची शक्यता
दक्षिण-पूर्व आरबी समुद्र मालदीव लक्षदीप परिसरात चक्रीय वार्याची स्थिती निर्माण झाली असून पूर्व मध्य अरबी समुद्रात स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा, घाट परिसरासह मध्य व उत्तर महाराष्ट्रात सध्या पाऊस सुरू आहे. आजही हवामान खात्याने राज्यातील 17 जिल्ह्यांना हायअलर्ट दिला असून अजून दोन दिवस हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग ही 30 ते 40 किलोमीटर प्रतितास इतका राहण्याची शक्यता असून पुढील तीन ते चार तासात काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.