बारामती : महान्यूज लाईव्ह
सत्तर ते ऐंशीच्या दशकात युवकांपासून प्रौढांपर्यंत ज्या नावाची मोहिनी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात होती, ज्यांच गारुड जिल्ह्याच्या विविध कानाकोपऱ्यात व वाड्या-वस्त्यांवर होते, ते मारुतराव धोंडिबा चोपडे (भाऊ) आज कालवश झाले. पिळदार मिशा, भरदार शरीरयष्टी आणि बोलण्यातील करारीपणा हे मारुतराव चोपडे यांचे वैशिष्ट्य होते.
मारुतराव चोपडे 87 वर्षांचे होते. आठ दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांना पुण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. ते शेवटपर्यंत सामाजिक कार्यात व राजकीय क्षेत्रात सक्रिय होते.
चोपडे यांनी सहकारात दीर्घ कारकीर्द अनुभवली. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, नीरा कॅनॉल सोसायटीच्या खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष व संचालकपद त्यांनी भूषविले. बारामती, इंदापूर सुपरवायझर युनियनचे ते माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक होते. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. 1974 ते 1978 या कालावधीत ते छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष होते.
एवढेच नाही तर ते छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे प्रदिर्घ काळ संचालक होते. 2015 पर्यंत ते छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. एकच सहकारी साखर कारखान्याचे तब्बल चाळीस वर्ष संचालक असण्याची बहुदा सहकारी चळवळीतील ही पहिली वेळ असेल. त्यांनी सन 1980 मध्ये भारतीय इंदिरा काँग्रेसच्या वतीने बारामती विधानसभा मतदार संघाची निवडणूक देखील लढवली होती. त्यांच्या निवडणुकीवेळी खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सभा घेतली होती. त्यानंतर त्यांनी पवार कुटुंबाशी जवळीक साधली. त्यानंतरही ते सहकारात कायम वेगवेगळ्या पदावर कार्यरत राहिले.