सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
आत्तापर्यंत उजनी मध्ये मगर आढळली आणि अनेक मच्छिमारांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा तिने उठवला पण एखाद्या विहिरीमध्ये मगर?… आता ती कल्पना देखील वास्तवात मगरीने आणली आहे इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील एका शेतातील विहिरीत आढळून आली आहे. ही मगर बाहेर काढण्याचे काम सध्या वन विभागामार्फत सुरू आहे.
इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील जगताप वस्ती नजीक नितीन शिपकुले यांच्या शेतातील विहिरीत ही मगर आढळून आली. मगर दिसताच शिपकुले यांनी वन विभागाला कल्पना दिली. त्यावरून वन विभागाची टीम या विहिरीच्या ठिकाणी पोचली. बुधवारी दुपारपासून ही मगर बाहेर काढण्याचे काम सुरू झाले अजूनही ते सुरू आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी, अशोक नरूटे, अमोल मारकड, राजू पवार, अप्पा देवकाते, रणजित कारंडे यांचे पथक या ठिकाणी कार्यरत असून स्थानिक ग्रामस्थांची त्यांना मदत सुरू आहे. भीमा नदी पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या विहिरीपर्यंत मगर पोचली असल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला असून, ही मगर येथे कशी पोचली याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.
जर मगर अशा ठिकाणी पोचली असेल, तर दिवसाढवळ्या देखील शेतकऱ्यांना भीती आहे. हेच यातून दिसत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान उजनीमध्ये अनेक मगरी असल्याच्या अफवांना देखील यामुळे शिक्कामोर्तब मिळाले आहे.