बारामती : महान्यूज लाईव्ह
माजी राज्यमंत्री धर्मराव आत्राम यांची आठवण करून देणारा हा प्रकार पुन्हा एकदा बारामतीत घडला असून, बारामती तालुक्यातील पणदरेच्या वनक्षेत्रात पाच सशांची आणि एका चिंकारा हरणाची शिकार केल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील तिघांचे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.
वनविभागाच्या पथकाने या संदर्भात कोरेगाव तालुक्यातील वैभव सुभाष घाडगे (वय 26) व संग्राम सुनील माने (वय 27) या दोघांसह पणदरे येथील आबाजीनगर भागातील सुनिल मारुती शिंदे (वय 40) व दादा रामभाऊ पवार (वय 37) या चौघांना अटक केली आहे. पाचवा आरोपी फरार असून तो सातारा जिल्ह्यातील आहे.
बारामतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांच्यासह वनकर्मचारी सुभाष पांडे, प्रकाश लोंढे, सचिन काळे, जयराम जगताप, नंदकुमार गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. हे पथक पणदरे वनक्षेत्राच्या हद्दीत गस्त घालत होते.
तेव्हा पाचजण हरीण आणि पाच सशांच्या शिकारीसह वनखात्याच्या पथकाच्या ताब्यात आढळून आले. यातील पाचवा आरोपी मात्र वनविभागाच्या पथकाची चाहूल लागल्याने पळून गेला. दरम्यान मृत हरणाचे शवविच्छेदन करून वनविभागाने वन गुन्हा दाखल केला आहे. पुण्याच्या उपवनसंरक्षक मयूर बोठे यांनी पणदरे वनक्षेत्राच्या हद्दीत भेट देऊन पाहणी केली.