घनश्याम केळकर, बारामती
(ही मुळ कथा अरेबियन नाईट्समधील असून या कथेशी तुमच्या शहराचा किंवा इतर कुठल्याही गावाचा कोणताही संबंध नाही मात्र तशा स्वरुपाच्या गोष्टी आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडत असतात त्या तशा असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.)
ती पार्टी खास लोकांसाठी होती. शहरापासून लांब, सगळ्या मुख्य रस्त्यांपासून आतल्या बाजूला असलेल्या एका ढाब्यावर होती. या पार्टीत पोलिसांची संख्या जास्त होती, नव्हे ती पार्टीच पोलिसांनी आयोजित केलेली होती. एका पोलिस अधिकाऱ्याने आपले प्रमोशन झाल्याबद्दल ही पार्टी आयोजित केली होती.
या पार्टीसाठी पोलिसांच्या जवळच्या, त्या अधिकाऱ्याच्या दोस्तीत असणाऱ्या लोकांनाच आमंत्रण होते. त्यात अनेक प्रतिष्ठित होते, तर अनेक मटका, दारूसारखे बेकायदेशीर धंदे करणारेही होते. पोलिसांचे दररोजचेच या लोकांशी संबंध येत असल्याने हे लोकही तिथे असणे स्वाभाविकच होते.
पार्टी रंगात आली होती. ग्लास भरले जात होते. गाणी वाजत होती. अनेकजण डान्स फ्लोअरवर थिरकत होते. सामिष भोजनाची तयारी होत होती, त्याचा वास सगळ्या वातावरणात भरून राहिला होता. थोड्या वेळाने यजमानांनी सर्वांना भोजनासाठी येण्याची विनंती केली. टेबल मांडले गेलेले होते, त्यावर ताटे वाढून तयार होती. जेवणात अनेक प्रकारचे पदार्थ होते, त्यात पशु पक्षांच्या मासांपासून बनलेल्या पदार्थांचा मोठा भरणा होता. जे शहरात खायला मिळणार नाही, असे अनेक पदार्थ आज तिथे खायला मिळणार होते.
सगळे पाहुणे जेवणासाठी टेबलावर आले. त्यांच्यामध्ये एक पाहुणा होता, जो आपल्या आजच्या गोष्टीतील प्रमुख पात्र असणार आहे. तो पुर्वाश्रमीचा चोर होता. लहान मोठ्या चोऱ्या माऱ्या करून त्याने बरीच माया जमविली होती. त्यानंतर त्याने त्याच पैशाचा वापर करून शहरात स्वत:चा व्यवसाय सुरु केला होता. मात्र या व्यवसायाच्या आडून त्याचा खासगी सावकारीचा धंदा जोरात सुरू होता. त्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीमुळेच त्याची काही पोलिसांशी चांगली जानपहेचान होती. त्या आधारावरच तो आजच्या पार्टीत पाहूणा म्हणून हजर होता.
आपला पाहूणा जेवणाच्या टेबलवर बसला. आज त्याचे नेहमीपेक्षा दोन तीन पेग जास्त झाले होते. पण तो व्यवस्थित होता. त्याने जेवणाच्या ताटाकडे नजर टाकली. त्याच्या ताटात मसाला भरलेला होला होता. ( होला हा एक पक्षी आहे, त्याचे मांस बऱ्याच भागात खाल्ले जाते. ) त्याने तो मेलेल्या होल्याकडे थोडा वेळ टक लावून पाहिले, आणि जोरजोराने हसायला सुरुवात केली.
आजुबाजूचे लोक त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघतच राहिले. बाजुच्या माणसाने थोड्या रागानेच त्याला विचारले , ” एवढे हसायला काय झाले ? ” हे ऐकून त्याने आपले हसणे थांबवले आणि तो म्हणाला. ” ऐका, सगळ्यांनी ऐका, जेवायला सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ती ऐका, मग आपण जेवू. “
सगळ्यांच्याच पोटात दोन चार पेग गेलेले असल्याने त्यांचे विमान जमिनीपासून थोडे वरच होते. काहीतरी गंमतीशीर ऐकायला मिळणार, या विचाराने सगळ्यांनी होकार भरला. त्याने आपली गोष्ट सांगायला सुरुवात केली.
पुर्वी मी थोड्याफार चोऱ्या माऱ्या केलेल्या आहेत. पण आता मी एक प्रतिष्ठित म्हणून बारामतीत नाव कमावले आहे. पण मला खरे पैसे या व्यवसायातून मिळत नाहीत. ते मला मिळतात सावकारीतून. मी लोकांना पैसे देतो, त्यावर व्याज आकारतो. त्या व्याजाचे पैसे एवढे मिळतात की, खरेतर मला कसलाही व्यवसाय करायची गरज नाही.
या व्याजाच्या धंद्यातीलच ही एक गोष्ट आहे. शहरात एक प्रतिष्ठित माणसाला एकदा अचानक पैशाची नड लागली. माझे काही एजंट मार्केटमध्ये आहेतच, त्यांनी त्याला माझ्यापर्यंत आणून पोचवले. त्या माणसाची नड फार तातडीची होती, त्यामुळे २० टक्के व्याज आकारून त्याला पाच लाख रुपये दिले, त्याला सहा महिन्यात सगळे पैसे फेडायचे होते. व्याज दर महिन्याला द्यायचे होते. मी त्याची एक एकर बागायती जमिन तारण करून घेतली.
मला जसे वाटले होते, तसेच झाले. तो माणूस फारच अडचणीत होता. तो महिन्याचे व्याज देऊ शकला नाही. मग मी व्याजावर व्याज वाढवत गेलो. अखेर मी त्याची जमिन माझ्या नावावर करून घेतली. पण आता मला त्याला मोकळे सोडायचे नव्हते. त्या जमिनीत माझे येणे पुरे होत नाही, म्हणून मी त्याच्याकडे असलेली उरलेली २ एकरही तारण करून घेतली, आणि त्याला त्या पैशासाठी २ महिन्याची मुदत दिली.
मला वाटले होते तसे तो दोन महिन्यात पैसे देऊ शकला नाही, मग ती दोन एकर माझ्या नावावर करून घेतली. तरी माझे देणे पुरे होत नाही असे सांगून त्याचे घरही नावावर करून घेतले. पण मला माहिती मिळाली होती की, त्याने आणखी काही पैसे दुसरीकडे ठेवले आहेत . तो पैसा मिळविण्यासाठी मी त्याला दमात घेऊ लागलो. माझे देणे दिले नाहीस तर तुला परिणाम भोगावे लागतील, असे मी त्याला सांगितले. माझ्या सोबतीला अनेक पोरे असायचीच. त्यांना वेळी अवेळी त्याच्याकडे पाठवायचो. तो प्रतिष्ठेला घाबरायचा, थोडेफार काहीतरी देऊन पोरांना परत पाठवायचा.
एके दिवशी मी त्याच्या घरी गेलो, तर तो घरी नव्हता. त्याची बायको घरात होती. मी पोरांना सांगून त्याच्या बायकोला उचलून आणले. त्याला निरोप पाठवला, २ लाख घेऊन ये, आणि बायको घेऊन जा. असली माणसे प्रतिष्ठेसाठी काहीही करतात. त्याने अनेकांकडून उसनवारी केली, आणि मला पैसे आणून दिले. मी त्याच्या बायकोला त्याच्या ताब्यात दिले.
आता मला खुपच पैसे मिळाले होते. या एकाच व्यवहारात मी प्रचंड फायद्यात होतो. पण मला पोरांनी एक टीप दिली. तो माणून आता शहर सोडून पळून चालला आहे. त्याने आपल्या बायकोला अगोदरच बाहेरगावी पाठवून दिले आहे. आता त्याच्याकडील शेवटचे असतील नसतील ते पैसे, दागिने मिळविण्याची ही संधी होती.
मी त्याच्या पाठलागावर गेलो. मी अखेर त्याला शेजारच्या घाटात अडवलेच. मला पाहून त्याने गाडी सोडून दिली, तो डोंगराकडे पळू लागला. मी त्याच्या मागे धावलो. डोंगराच्या चढावर मी त्याला खाली पाडले आणि त्याच्या छातीवर बसलो. तुझ्याकडे जे काही आहे, ते सगळे दे. माझे देणे द्यायचे सोडून कुठे निघालास, मी जोरात ओरडलो. जे काही आहे ते माझ्या गाडीत आहे, ते सगळे घेऊन जा, पण मला सोड, तो म्हणाला.
पण त्याच्या पुढच्या वाक्याने माझे डोकेच कामातून गेले. देव तुला बघून घेईल, तुला कुत्र्याच्या मौतीने मरशील, असे म्हणून तो माझ्या तोंडावर थुंकला. आता मात्र मी त्याला सोडणार नव्हतो. मी त्याचा गळा दाबला. तो म्हणाला, आता मला सोड, जे काही आहे, ते सगळ मी तुला दिले आहे. मी त्याला म्हणालो, आता मी तुला सोडणार नाही, तु आज मरणार माझ्याकडून.
त्याने वर पाहिले, आकाशातून एक होला उडत चालला होता. ” हे होल्या, तुच साक्षी आहेस, मी या माणसाला सगळ काही दिले, पण तरीदेखील त्याने माझा जीव घेतला, याला तु साक्षी आहेत, हे होल्या. “
हे त्याचे अखेरचे शब्द. मी त्याचा गळा इतका जोरात आवळला, की तो मरुनच पडला. आज माझ्या ताटात मरून पडलेला होला बघून मला त्या गोष्टीची आठवण झाली. त्याचा होला साक्ष देणार होता माझ्या विरोधात. बघा कसा मरुन पडलाय माझ्यासमोर .
ऐवढे बोलून पाहुण्याने पुन्हा जोरजोराने हसायला सुरवात. त्याचे हे भयंकर वागणे आणि त्याचे हसणे ऐकून शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यात तिडीकच गेली. त्याची कमरेचे पिस्तूल काढले आणि पाहुण्याच्या डोक्याला लावले.
तोपर्यत दुसऱ्या एका पोलिसाने पाहुण्याच्या पोटात अशी फाईट मारली, ती तो एकदम जमिनीवरच पडला. आणखी एक जण त्याच्या छातीवर बसला, आणि त्याला म्हणाला, ” तुला काय वाटलं, होल्याने साक्ष दिली नाही. त्याने आताच आमच्यासमोर साक्ष दिली आहे. तु जे काही केले आहेस, त्याची फळे तुला पुढचे जन्मभर भोगावी लागणार आहेत. “
यानंतर काही दिवसातच या पाहूण्याची रवानगी तुरुंगात झाली, या पार्टीला अनेक मोठे पोलिस अधिकारी होते. त्यांनी हा विषय फार गांर्भियाने घेतला. त्याच्या विरोधातील सगळे पुरावे शोधून काढण्यात आले. न्यायालयानेही त्याला सोडले नाही, आजदेखील तो तुरुगांत शिक्षा भोगतो आहे.