भोर : महान्यूज लाईव्ह
माणिक पवार
विविध शासकीय समित्यांवर नेमणूक करताना विश्वासात घेतले जात नाही.प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंताना डावलले जात असुन हुजरेगिरी करणाऱ्यांना पदे दिली जातात. त्यामुळे पक्षाच्या जबाबदारीतुन कार्यमुक्त करण्याची मागणी भोर तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खा. अनील देसाई, रविंद्र मिर्लेकर, बाळासाहेब चांदेरे यांच्याकडे केली आहे. यामुळे शिवसेनेला खिंडार पडणार आहे. भोर तालुका शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख युवराज जेधे, युवासेनाप्रमुख केदार देशपांडे, भोर शहरप्रमुख नितिन सोनावले यांनी पञकार परिषद घेऊन वरील मागणी केली आणी शिवसेना उपनेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच पुढील काळात शिवसेनेचे काम न करण्याची घोषणा केली. यामुळे भविष्यात शिवसेनेत खिंडार पडणार अशीच चर्चा आहे, यावेळी तुकाराम गोळे, बाळासो वाटकर, स्वनील शिनगारे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना पदाधिकारी निवडीसाठी ३५ नावे दिली होती. माञ त्यातील २ जणांचीच निवड करण्यात आली, यामुळे पक्षाचे प्रमाणिकपणे काम करणाऱ्या कार्यक्षम पदाधिका-यांना डावलले. विविध समित्यावरील निवड तसेच इतर कामात विश्वासात घेतले जात नाही. सतत डावलले जाते, उलट हुजरेगीरी करणारे, नेत्यांच्या पुढे पुढे करणा-यांनाच पदे दिली जातात. वरिष्ठ काम करत नसल्यामुळे कार्यकत्यांच्या अपेक्षा पुर्ण होत नाहीत. त्यामुळे पक्षाने दिलेल्या जबाबदारीतुन कार्यमुक्त करण्याची मागणी युवराज जेधे, केदार देशपांडे, नितिन सोनावणे, इतर पदाधिकारी यांनी खासदार अनिल देसाई, उपनेते रविंद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, सत्यवान उभे, राजेंद्र काळे यांच्याकडे केली आहे.
हुजरेगिरी करणाऱ्याला महत्त्वाचे स्थान..
प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पदाधिकारी यांची अडचण होत असुन, याला नेते रविंद्र मिर्लेकर जबाबबदार असल्याचा गंभीर आरोप यावेळी शिवसेना पदाधिकारी यांनी केला. मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी दिली असताना, पक्ष सोडुन राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली, अशा गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेऊन जिल्ह्याचे पद दिले जाते. यामुळे भोर तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख, उपतालुका विभागप्रमुख, युवासेना, प्रमुख विदयार्थी संघटना, विभागप्रमुख, बुथ कमिटयाचे पदाधिकारी असे ८० ते १०० पदाधिका-यांनी राजिनामे दिले आहेत. भविष्यात शिवसेनेचे काम न करण्याचा निर्णय घेतला असुन पर्याय खुला असल्याचे सांगितल्याने भोर तालुक्यात शिवसेनेला खिंडार पडणार आहे.