दौंंड : महान्यूज लाईव्ह
राजेंद्र झेंडे
बारामती, दौंड, इंदापुर या तालुक्यासह जिल्हयातील अनेक गावांतील शेतक-यांच्या शेतातील कृषी पंपाच्या वीजजोड महावितरणने तोडण्याच्या सपाटा लावला आहे. वीज बिले भरा मग वीज जोड करू असा पवित्रा महावितरणने घेतला आहे. या विरोधात मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात शेतक-यांची महावितरण वीज कंपनीच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलने सुरू आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या या भुमिकेवर शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. तर भाजपसह शेतकरी संघटनांही राज्यसरकार विरोधात मैदानात उतरले आहेत. कृषी पंपाच्या वीज तोडीमुळे शेतक-यांच्या या रोषाचा मोठा फटका काही दिवसांवर येवू घातलेल्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील शेतकरी या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला शॅाक देणार का ? शेतक-यांच्या या नाराजीचा फायदा भाजप आणि मित्र पक्षांना होणार का ?
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या सरकारच्या विरोधात जिल्ह्यात ठिकठिकाणी उपोषण, धरणे, आंदोलने सुरू आहेत. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होत आहेत. महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर रात्रंदिवस हे आंदोलन सुरू आहेत. महावितरण वीज कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाच्या वीज तो़ड केली आहे. रोहीत्रांमधील वीज पुरवठा बंद केला आहे. परिणामी वीज पुरवठा नसल्याने शेतक-यांना शेतातील शेतपिकांना पाणी देता येत नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वीज बिले भरल्याशिवाय वीज जोड करणार नसल्याचा पावित्रा वीज कंपनीने घेतला आहे. या भुमिकेमुळे महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच महाविकास आघाडी आपली भुमिका जाहीर करीत नाही. बारामती, दौंड, इंदापुर या तालुक्यात सध्या या आंदोलनाला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भुमिकेवर जिल्हयातील शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. राष्ट्रवादी आणि कॅाग्रेस पक्षाचे अनेक शेतकरी कार्यकर्तेही याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. येत्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान न करण्याचा निर्णय अनेक शेतकरी घेत असून ते उघडपणे आपली भुमिका जाहीर करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारने वीजेच्या दरात प्रचंड दर वाढ केली आहे. बी बियाणे, खते, दुग्धव्यवसाय आदींचे दर मोठ्या प्रमाणात वाढवले आहे, त्यातच आता कृषी पंपाच्या वीज जोड ही तोडली आहे. शेतकऱ्यांची सगळीकडून पिळवणुक व शोषण करण्याचे काम हे सरकार करीत असून शेतकरी विरोधी धोरणे राबवित असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. त्यामुळे सध्या जिल्हयात आघाडी सरकारच्या विरोधात चांगलेच वातावरण तापले असून याचा मोठा फटका आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चिंता आहे. तर शेतकऱ्यांच्या या रोषाचा मोठा राजकीय फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हयात हे आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी केले आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपच्या जिल्हयात किती जागा वाढतील हे मात्र निवडणुक निकालानंतरच स्पष्ट होईल.