बारामती : महान्यूज लाईव्ह
अग्रीकल्चरल डेव्हलोपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, पुणे, व वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर (वनामती) यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 28 नोव्हेंबर 2021 या दरम्यान शास्त्रीय मधुमक्षिकापालन या विषयावर ग्रामीण युवकांसाठी कौशल्य आधारित 7 दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रतन जाधव यांनी मधुमक्षिका पालन हे कशा पद्धतीने रोजगार निर्मिती साठी उपयोगी आहे व मधमाशी पासून मिळणारे विविध उत्पादने यांविषयी माहिती देत, या उत्पादनांचे विक्री व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षणातील विषय विशेषज्ञ डॉक्टर मिलिंद जोशी यांनी मधमाशीच्या विविध जाती, मधमाशीचे पिकांच्या परपरागीभवनातील महत्व, मधमाशी पासून मिळणारे राजान्न, मधमाशीचे विष, आदी उत्पादनांबरोबरच मधमाशीचे कीड आणि रोग; शत्रू आणि त्यांचे व्यवस्थापन या विषयावर सखोल माहिती दिली.
श्री. प्रशांत गावडे यांनी मधमाशी पालनासाठी योग्य जातीची निवड, तसेच स्थलांतर, व्यासायिक दृष्ट्या विविध अनुदानित योजना या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. अल्पेश वाघ व सचिन क्षीरसागर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मधमाशीची हाताळणी, नैसर्गिक पद्धतीने शुद्ध मधाची काढणी, मधमाशी पालनासाठी लागणारे विविध साहित्य, मधमाशी पासून जास्तीत जास्त मधाचे उत्पादन घेण्यासाठी फुलोऱ्याचे व्यवस्थापन, इत्यादी गोष्टींची प्रात्यक्षिकांसहित माहिती दिली.
कार्यक्रमाच्या समारोपादिवशी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना जागतिक बाजारपेठेत मधमाशीपासून मिळणाऱ्या पदार्थांचे महत्व व्यक्त करत मधमाशी उद्योजक घडवण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. डॉ. मिलिंद जोशी यांनी प्रशिक्षणार्थ्यांबरोबर विविध विषयांतील शंका निरसन करून आभार मानले.
यावेळी बारामती, दौंड, भोर व इंदापूर परिसरातील 15 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.