सणसर : महान्यूज लाईव्ह
किशोर भोईटे
कोवीड प्रादुर्भावामुळे जवळपास २ वर्षे बंद असलेल्या शाळा आजपासून सुरु होण्याची शक्यता होती. मात्र नव्याने सापडलेल्या ओमीक्रॉन प्रकारातील कोराना विषाणूचा प्रादूर्भाव होण्याची भीती लक्षात घेऊन आजपासून सुरु होणाऱ्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत. बऱ्याच दिवसानंतर शाळा सुरु होणार म्हणून आनंदात असलेले पालक, विद्यार्थी तसेच शिक्षकांचाही यामुळे हिरमोड झाला आहे.
पहिली ते चौथी पर्यतच्या प्राथमिक शाळा १ डिसेंबर पासून सुरू करण्यासाठी शासनाने दिनांक 29 नोव्हेंबर रोजी आदेश काढला होता. सर्व नियमांची पूर्तता करून शाळा सुरू कराव्यात असे आदेश दिले होते. मात्र आता नव्याने 30 नोव्हेंबरला पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सुधारीत आदेश काढला आहे. पुढील आदेश येईपर्यंत शाळा सुरू होणार नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शिकण्यासाठी पुन्हा काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र ऑनलाइन शिक्षण चालूच राहणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख, सीईओ आयुष प्रसाद व जिल्हा शिक्षण अधिकारी अनिल गुंजाळ यांनी सर्व गट शिक्षण अधिकारी यांना दिले आहेत.
शिक्षकांनी कोवीडच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांची पूर्वतयारी करण्याकरीता शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश या पत्रानुसार देण्यात आले आहेत. शाळेचे निर्जंतुकीकरण करणे, स्वच्छता करणे, वर्गखोल्यांची पुरेशी उपलब्धता, सामाजिक दुरत्व राखण्यासाठीची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था तसेच शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन पूर्वतयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शाळांमधील विजेची जोडणी व वीज बिल, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.