ह्रदय विकाराच्या झटक्यानं निधन झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबियांस वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या सर्व स्टाफच्या वतीने अर्धिक मदत
प्रदीप जगदाळे : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात मासाळवाडी येथील प्रशांत गोरे होमगार्ड म्हणून नियुक्तीस होते. गोरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काही दिवसांपूर्वी निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
त्यांची परिस्थिती हलाखीची होती त्यामुळे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी एकत्र आले आणि त्यांनी जमा केलेल्या लोकवर्गणीतून 75 हजार रुपयांची रोख रक्कम जमा झाली.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या हस्ते नुकतीच गोरे यांच्या कुटुंबीयांना ही 75 हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. ज्या पोलिस ठाण्यात आपला मुलगा होमगार्ड म्हणून काम करत होता त्या पोलिस ठाण्याच्या सहकाऱ्यांनी त्याचं कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून केलेली ही मदत गोरे यांच्या कुटुंबियांना भावनावश करून गेली.
यावेळी सहाय्यक फौजदार सलीम शेख, पोलिस नाईक पानसरे, दैनिक पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे, चांडाळ चौकडीच्या करामती वेबसिरीजमधील सरपंच सूदामराव नेवसे, पत्रकार चिंतामणी क्षिरसागर, निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुरलीधर ठोंबरे, बाबूर्डीचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, बोरकरवाडीचे पोलिस पाटील राहूल बोरकर, राजकुमार लव्हे, सूरज शिंदे, मासाळवाडीचे पोलिस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.