युवराज जाधव, सांगली
साता जन्माच्या गाठी म्हणे स्वर्गात बांधल्या जातात. त्या स्वर्गात बांधल्या जातात की नाही? हे पाहायला कोणी नसले, तरी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी जोडपी अगदी एकमेकावर जीव देखील ओवाळून टाकतात. अगदी तसाच काहीसा अनुभव सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात आला. 85 वर्षांच्या पतीने जगाचा निरोप घेतल्यानंतर, अवघ्या काही मिनिटात 80 वर्षाच्या पत्नीने देखील या जगाचा निरोप घेतला.
ही हृदयद्रावक घटना घडली, आटपाडी शहरातील संपत नगर या भागात! येथे राहत असलेल्या अहिवळे कुटुंबातील काशिनाथ शंकर अहिवळे या 85 वर्षीय आजोबांनी वृद्धापकाळामुळे जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने अगदी काही मिनिटात त्यांच्या 80 वर्षीय पत्नी वैजयंती यांचाही मृत्यू झाला.
अचानक दोघांचाही मृत्यू झाल्याने आहिवळे कुटुंबासह परिसरातील सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या एकत्रित जाण्याने आटपाडी तालुक्यातील इतर गावांमध्ये शोककळा पसरली होती.