घनश्याम केळकर
बारामतीच्या तीन हत्ती चौकात नेहमीच गर्दी असते. येथे मजूर अड्डाही आहे, जिथे सकाळी मजुरांची गर्दीही असते. मात्र दुपारच्या वेळेस मात्र हा चौक थोडा निवांत असतो.
या तीन हत्ती चौकापासून थोड्या अंतरावर नीरा डाव्या कॅनॉलच्या बाजूला तीन चार जणांचे टोळके बसलेले होते. आपआपसात काहीतरी कुजबूज चालू होती. वरवर पाहणाऱ्यांला वाटले असते, बसले आहेत कोणीतरी पत्ते खेळणारे, किंवा कोणी काही काम नसल्याने निवांत बसलेले मित्र. पण हे टोळके अट्टल चोरांचे होते. अतीशय सावधपणे इकडे तिकडे नजर टाकत ते तिथे बसले होते. या टोळक्याने बारामतीत नाही, तर आसपासच्या तीन चार जिल्ह्यात शातीर म्हणून नाव कमावलेले होते. अजूनही ते पोलिसांच्या जाळ्यात सापडलेले नव्हते. आताही आज काय कांड करायचे अशी त्यांची चर्चा सूरू होती.
तेवढ्यात त्यांची नजर भिगवण चौकातून तीन हत्ती चौकाकडे येत असलेल्या एका अॅक्टिव्हावर पडली. ती अॅक्टिव्हा पाहून एकजण उठून उभा राहिला. पण दुसऱ्याने त्याचा हात ओढून त्याला खाली बसवला. ” बस खाली, त्याच्या मागे जाऊन काही उपयोग नाही. आजवर अनेकांनी प्रयत्न केले, पण कोणालाही यश आले नाही. तो शेठ लई सावध असतो. अजिबात फसत नाही. “
तो शेठ म्हणजे धर्माशेठ. त्यांचे बारामतीच्या बाजारपेठेत कपड्याचे दुकान होते. धर्माशेठ म्हणजे एकदम वक्तशीर माणूस. त्यांच्या येण्याजाण्यावर लोक घड्याळ लावीत. वेळेत दुकान उघडणार, वेळेत बंद करणार. दुपारी ठरलेल्या वेळेत जेवणासाठी घरी जाणार. आताही ते जेवणासाठीच घरी निघालेले होते. अॅक्टिव्हाच्या डिकीत एक छोटी बॅग होती. आज सकाळपासून जमा झालेला गल्ला त्या बॅगेत होता. चोरांनी म्हणले तसे ते नेहमी अत्यंत सावध असत. त्यामुळे त्यांना फसवणे आजवर कोणाालाही शक्य झाले नव्हते.
पण ज्याला हात धरून खाली बसविण्यात आले तोदेखील साधासूधा नव्हता. त्याच्या हाताला जणू वजनच नव्हते, केव्हा माल लंपास केला, हे त्याला स्वत:ला देखील कळत नसे. आपल्याला हात धरून पुन्हा खाली बसविण्यात आले ते त्याला फारच लागले. ” आणि मी या शेठचा गल्ला हाणला तर, काय पैज लावता. ” त्याने संवगड्यांसमोर सवाल टाकला. ” हे बघ, शेठ आता घरी चाललेत, त्यांच्याजवळ एक छोटी बॅंग आहे, त्यात त्यांचा आजच्या दिवसाचा गल्ला आहे. ती बॅग जर तु पळवली तर तु असली चोर. आमचा सगळ्यांचा यापुढे तु पुढारी. तु म्हणशील तस आम्ही मागणार, आणी यापुढे जो काय माल मिळेल त्यातला तुझा वाटा आमच्यापेक्षा जास्त राहणार. पण जर तु बॅग नाही आणू शकला, तर तुझा वाटा आमच्यापेक्षा कमी राहणारच, पण आज रात्रीचा आमचा होईल तो खर्च तुला करायला लागेल. बोल आहे कबूल.”
“कबूल” म्हणेपर्यंत त्याने शेजारी उभ्या असलेल्या गाडीला किक मारली. जोरात गाडी सोडली. पाच सात मिनिटातच त्याने धर्माशेठच्या गाडीला गाठले. मग धर्माशेठच्या मागे त्यानी आपली गाडी ठेवली.
सहयोग सोसायटीच्याच्या बाजुलाच धर्माशेठचा बंगला होता. बंगल्यापुढे छोटीशी बाग, व्हरांडा, व्हरांड्यात एक नोकरा चाकरांना बसण्यासाठी लाकडी बाक, तेथून आत त्यांचा हॉल आणि घराचा आतील भाग होता. धर्माशेठची गाडी बाहेरच्या गेटवर आली. त्यांनी हॉर्न वाजवला. घरामध्ये एक मोलकरीण काम करत होती. हॉर्नचा आवाज ऐकून ती बाहेर आली. तिने त्या बागेचे गेट उघडले व घाईघाईने आत निघून गेले. धर्माशेठने गाडी आत घेतली. व्हरांड्यासमोर लावली. डिकीतील बॅग घेतली व व्हरांड्यात आले. धर्माशेठला डायबेटीसचा त्रास होता, त्यामुळे त्यांना सारखी लघवीला लागायची. आताही त्यांना जोरात लघवीला लागली होती. त्यांनी ती बॅग व्हरांड्यातील बाकावर ठेवली आणि ते घाईने आत गेले.
त्यांच्या मागावरच असलेल्या चोराने संधी साधली. तो सरळ आत आला, बॅग उचलली आणि निघून गेला. शेठ लघवी करून परत आले तर बॅग गायब आणि गेटचा दरवाजा उघडा. त्यांनी मोलकरणीला बोलावले आणि गेटचा दरवाजा उघडा ठेवल्याबद्दल तणतण करण्यास सुरुवात केली.
इकडे तो चोर बाहेर पडला, पण त्यांचे मित्र त्याला बाहेरच भेटले. ते त्याच्याच मागे तिथे आले होते. त्याने पोटाशी लपवलेली बॅग खुणेनेच दाखवली. तेवढ्यात शेठजी मोलकरणीला रागे भरत असल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. चोराचा एक साथीदार म्हणाला, ” तु तुझ काम केलस खर, पण आता ती मोलकरीण शेठच्या शिव्या खाणार. “
” त्याचाही बंदोबस्त करतो. ” असे म्हणून चोर पुन्हा गेटमधून आत शिरला. त्याचे सवंगडी बाहेर लपून कानोसा घेऊ लागले. ” नमस्ते शेठ, मी तुमच्या दुकानाच्या बाजु्च्याच दुकानात कामाला असतो, वसंताशेठकडे. नविनच लागलोय तिथे, आमच्या शेठने मला तुमच्याकडे पाठवले. “
आधीच झालेल्या चोरीने वैतागलेल्या धर्माशेठने त्रासिक नजरेनेच त्याच्याकडे पाहिले.
” ही तुमची बॅग तुम्हाला द्यायला शेठने सांगितले आहे. ” असे म्हणून त्याने ती बॅग बाहेर काढली. शेठ त्या बॅगकडे बघतच राहिले. ” ही बॅग आमच्या दुकानाच्या काऊंटरवरच विसरून गेला होतात तुम्ही. ती तुम्हाला देण्यासाठी शेठने मला पाठवलय. “
आता धर्माशेठचा थोडा गोंधळ उडाला. शेजारच्या दुकानदाराशी त्यांची चांगली मैत्री होती. अनेकदा ते त्या दुकानात जाऊन गप्पा मारत असत, पण आज येताना ते तिथे गेल्याचे त्यांना काही आठवत नव्हते. पण मग हा माणूस बॅग घेऊन कसा काय आला, असाही प्रश्न त्यांच्या मनाला पडला. त्यांचा थोडासा गोंधळ उडाला. कदाचित आपण तिथे गेलो असू. आपल्याच लक्षात नसेल असे त्यांना वाटले. मग त्यांनी मनाशी विचार केला की बॅग तर मिळाली ना, बाकीचे ते नंतर बघू. असा विचार करून ते चोराला म्हणाले, ” ठिक आहे, दे ती बॅग इकडे”
“बॅग द्यायलाच आलोय मी, पण एक विनंती आहे, जरा आमच्या शेठला फोन करून सांगा, बॅग मिळाली म्हणून, नाहीतर ते माझ्यावर खवळतील. “
” बर, बर,” असे म्हणून शेठने आपल्या खिशाकडे हात नेला. खिशात मोबाईल नव्हता. ते मोबाईल आणण्यासाठी घरात गेले आणि चोराने पुन्हा धुम ठोकली.
शेठ परत येईपर्यंत चोर गायब झाला. डोक्याला हात लावून शेठ त्या बाकावर काही वेळ बसून राहिले.
एकाच घरातून दोनदा चोरी करणाऱ्या त्या चोराची चर्चा बारामतीच्या बाजारपेठेत त्यानंतर अनेकदा होत राहिली.
( मुळ गोष्ट अरेबियन नाईट्समधील असून आजच्या काळानूरुप काही बदल करून त्यात बारामतीचे काही संदर्भ जोडले आहेत. )