शिरूर : महान्यूज लाईव्ह
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची एफआरपीची रक्कम २५५० रुपये हप्ता लवकरच सभासदांच्या खात्यावर लवकरच वर्ग केला जाणार असल्याची माहिती श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.
यावेळी बोलताना राजेंद्र नागवडे यांनी सांगितले की, सहकारी कारखान्यामध्ये यावर्षीचा जिल्ह्यातील सर्वात जास्त अंतिम एफआरपीचा भाव २६०० रुपये जाहीर केला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर २५५० हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे.
सध्या साखर कारखान्याने जास्तीत जास्त गाळप कसे होईल याकडे लक्ष दिले आहे. शिरूर तालुक्यातील अनेक सभासद गट कार्यालय जवळ नसल्याने सभासदांना लांब यावे लागते.यात वेळ व पैसा वाया जातो. यामुळे सभासदांना त्रासाला सामोरे जावे लागते. हा त्रास कमी करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तांदळी किंवा मांडवगण फराटा परिसरात गट कार्यालये उभारली जाणार आहे. या कार्यालयात शेतकऱ्यांना उसाच्या नोंदी व साखर वाटप करणे अधिक सुलभ होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
श्रीगोंदा साखर कारखान्याने नेहमीच सभासदाच्या हिताचे धोरण अवलंबले असून जास्तीत जास्त भाव देण्यासाठी संचालक मंडळ नेहमी प्रयत्नशील राहील. कारखाना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्यालाच ऊस द्यावा असे आवाहन नागवडे यांनी केले. यावेळी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष युवराज चितळकर, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुभाष शिंदे आदी उपस्थित होते.