बारामती : महान्यूज लाईव्ह
संस्कृती रंजन आयआयटी ( बीएचयू ) मध्ये प्रवेशासाठी पात्र ठरली. केवळ या प्रवेशासोबत लागणारी रु.१५००० ही फी ती भरू शकत नव्हती, यामुळे ती आयआयटीमध्ये शिकण्यापासून वंचीत राहणार होती. परंतू आता लखनौ न्यायालयाने तिची ही फी भरण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबर जर तिच्या जागेवर कुणा दुसऱ्याला प्रवेश दिला गेला असेल तर अतिरिक्त जागा निर्माण करून तिला प्रवेश देण्याचा आदेश आयआयटी ( बीएचयू ) ला देण्यात आला आहे.
संस्कृती एक हुशार विद्यार्थी. दहावीला ९५.६ टक्के, बारावीला ९२.७७ टक्के, जेईई मेन्समध्ये २०६२ वी रॅंक, एससी कॅटॅगिरीमध्ये १४६९ रॅंक, १६ डिसेंबर ला जेईई अॅडव्हान्ससाठी अर्ज केला. ही परिक्षेतही ती १५ ऑक्टोबर रोजी पात्र ठरली. ती आयआयटी ( बीएचयू ) मध्ये प्रवेशही मिळाला. पण तिच्या हुशारीच्या आड आली तिच्या कुटुंबाची गरीबी. या प्रवेशासोबत भरावी लागणारी रु. १५००० ची फी ती भरु शकत नव्हती. अखेर तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
न्यायालयाने तिचे म्हणणे ऐकून घेतले. केवळ पैसे नाहीत म्हणून अशा विद्यार्थिनीला शिक्षण सोडून द्यावे लागणे योग्य नाही, या विचारातून लखनौ न्यायालयाने तिच्या फीचे पैसे भरण्याचा निर्णय घेतला. तसेच तिला प्रवेश द्यावा असे आदेश आयआयटी ( बीएचयू ) ला दिले.