मुंबई : महान्यूज लाईव्ह
बरेच दिवस गायब असलेले परमबीर सिंह अखेर न्यायालयाने अटकेपासून दिलेल्या संरक्षणानंत मुंबईत दाखल झाले. आता कोणतीही रितसर परवानगी न घेता त्यांनी सचीन वाझेंबरोबर मारलेल्या तासाभराच्या गप्पांची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. परमबीर सिंह हे सोमवारी निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदिवाल यांच्या चौकशी आयोगापुढे हजर झाले. यावेळी परमबीर सिंह आणि सचीन वाझे यांची भेट झाली. कोठडीत असलेले सचीन वाझे आणि याच प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असणारे परमबीर सिंह आयोगाच्या कार्यालयात एकमेकासमोर आले. त्यानंतर दोघे तासभर गप्पा मारत होते.
आता अशा प्रकारे त्यांना भेटण्याची परवानगी दिली कशी काय, यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आता याबाबत चौकशीचे आदेश दिलेले आहेत. ” हे अत्यंत चुकीचे आहे. जेव्हा एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा त्याला कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेरच्या लोकांना भेटण्याची अनुमती नसते. मात्र तरीही त्यांनी भेट घेतली याची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तांना सांगण्यात आले आहे. “
आता या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून एक उपनिरीक्षक व तीन शिपायांचे जबाब नोंदविल्यानंतर त्याची कागदपत्रे नवी मुंबई पोलिसांना सुपुर्त करण्यात आली.
अनील देशमुख यांच्या वकिलांनी या प्रकाराबाबत आयोगासमोर नाराजी व्यक्त केली. आयोगाने सचिन वाझेंना आयोगासमोर हजर करण्याचे आदेश दिले . कायदेशीर परवानगीशिवाय कोणाशीही न बोलण्याचे तसेच न भेटण्याबाबत त्यांना ताकिद देण्यात आली.
दरम्यान परमबीर सिंह यांनी आयोगाला एक प्रतिज्ञापत्र दिले असून त्यामध्ये आपल्याकडे अजून काहीही पुरावे नाहीत, जे आहेत ते याअगोदरच यंत्रणांना दिलेले आहेत, असे म्हणलेले आहे.
आयोगासमोर हज होण्यापूर्वी परमबीर सिंह गृह रक्षक दलाच्या कार्यालयात गेले होते. परंतू त्यांनी अद्याप तेथील पदभार स्विकारलेला नाही.