मुंबई : महान्यूज लाईव्ह
एका वृत्तपत्राने स्ट्रींग ऑपरेशनव्दारे देशात चाललेला बनावट नोटांचा अवैध धंदा उघड केला आहे. फ्रान्समधून हा सगळा धंदा चालविला जात आहे. देशातील २५ शहरात हा उद्योग फ्रान्समध्ये राहणारा मायकेल नावाचा व्यक्ती चालवत आहे. २००० आणि ५०० च्या नकली नोटा तो त्याच्या साथीदारांमार्फत गिऱ्हाईक पाहून त्यांना विकत आहे.
या वृत्तपत्राच्या या स्ट्रींग ऑपरशनमध्ये अनेक बाबी उघड झाल्या आहेत. या वृत्तपत्राच्या बातमीदाराने फ्रान्समध्ये राहणाऱ्या मायकेलला व्हाटसएपवरून संपर्क साधला. मालकेलने सांगितले की दिल्ली आणि बेंगळूरू येथे खात्री करुन घेण्यासाठी बनावट नोटा मिळू शकतात. या नोटा तुम्ही बाजारात खपवून आपली खात्री करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही १ लाख रुपये द्या, तुम्हाला चार लाखाच्या बनावट नोटा दिल्या जातील. मायकेलशी झालेल्या बोलण्यानंतर त्याच्या दिल्लीतील साथीदाराने संपर्क साधला. या साथीदाराला या कामात १० टक्के कमीशन मिळत होते.
२९ नोव्हेंबरला मायकेलने व्हाटसएप व्हिडिओ कॉलव्दारे बनावट नोटांचे बंडल दाखवले. मायकेलने २४८४० रुपये नोटा मोजणाऱ्या मशीनमधून मोजून घेतल्याचा व्हिडिओही दाखवला. या मशीनने बनावट नोटा ओळखल्या नाहीत.
यानंतर दिल्ली येथे मालकेलचा साथीदार यातारे याला भेटण्यासाठी बातमीदार गेला. सोमवारी सकाळीच दिल्ली पोलिसांनी रिपोर्टरला भेटण्यासाठी आलेल्या या साथीदाराला अटक केली. या साथीदारबरोबर असणारे एका आफ्रिकन महिलेसह तिघेजण पळून गेले. दुपारपर्यंत फ्रान्समध्ये बसलेल्या मायकेलला आपला साथीदार पकडला गेल्याचे माहिती नसावे. तो व्हॉटसएपवरून संपर्क साधून होता. त्याने २५ लाख द्या, मी १ करोडच्या नोटा देतो असेही सांगितले.
मात्र चारच्या सुमारास त्याने व्हॉटसएपवरून संपर्क साधला आणि बातमीदाराला धमकी दिली. जगात कोठेही लपलास तरी तुला सोडणार नाही, २४ तासात तुला मारून टाकीन असे तो धमकावत होता. मात्र यावेळी त्याने आपला चेहरा दाखवला नाही.
पोलिसांच्या चौकशीत यातारेने सांगितले की, फ्रान्सवरून मायकेल फोन करून त्याला कुणाला भेटायचे ते सांगत असे. त्याचे काम केवळ गिऱ्हाईकाची माहिती गोळा करणे हे होते, त्यासाठी त्याला १० टक्के कमीशन मिळत असे. नोटा कुठे छापतात हे त्याला माहिती नव्हते. नकली नोटांची बंडले मायकेल पाठवत होता. भारतातील २५ शहरात मायकेलचे दक्षिण आफ्रिकन साथीदार आहेत, त्यांच्या साह्याने तो हा सगळा धंदा चालवत असतो.