सोशल मीडियामुळे हरवलेली बालके पालकांच्या स्वाधीन
शिरूर : महान्यूज लाईव्ह
जगाच्या इतिहासात आपण अनेकदा कोणीतरी सहज घरातून निघाले आणि फिरता फिरता काही देशांचा शोध लागल्याची माहिती आपण आजवर ऐकत आलो आहोत.. पण काल रात्री शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील तीन लहान शाळकरी मुले घरातून बाहेर पडली आणि बेपत्ता झाली..! सगळीकडे शोधाशोध सुरू झाली.. अगदी अपहरणाच्या देखील अफवा पसरल्या.. पालक भयभीत झाले! पण ही शोधाशोध सुरू असतानाच, सोशल मीडिया वरून फिरलेल्या मेसेजमुळे ही मुले नातेवाईकांच्या बारामती तालुक्यातील एका गावात पोहोचल्याचे लक्षात आले आणि पालकांचा जीव भांड्यात पडला!
घरातून बाहेर जात बेपत्ता झालेल्या वडगांव रासाई (ता.शिरूर) येथील तीन मुलांचा सोशल मीडियामुळे शोध लागला असून, मध्यरात्री बालके पालकांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वडगांव रासाई येथील सोहम लाड,सोहम घायतडक,अजय वारकड ही तीन मुले घरातून बेपत्ता झाली होती.
मुले बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी शोध सुरू केला होता. तर सोशल मीडियावर मुले हरवली आहेत तसेच सापडल्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून मांडवगण फराटा पोलिस चौकीच्या अंमलदारानीही तातडीने शोध मोहीम सुरू केली होती.
अखेर रात्री उशिरा सदर बेपत्ता मुले पांढरेवाडी (तालुका. बारामती) येथे असल्याची माहिती मिळाली.अखेर मध्यरात्री ही मुले पालकांच्या स्वाधीन करण्यात आली. या शोध मोहीमेत वडगाव रासाई चे सरपंच सचिन शेलार, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण फराटा चे पोलिस अंमलदार जगताप, विष्णू दहिफळे यांच्यासह वडगाव ग्रामस्थ, युवकांनी मोलाची भूमिका पार पाडली. मुले पालकांच्या स्वाधीन करताना अखेर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.