संदीप मापारी पाटील, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपस चक्रे फिरवीत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
आपल्याला बिडी दिली नाही म्हणून आपण त्याला ठार केल्याची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुसरीकडे राणी नावाच्या श्वानानेही आरोपीला ओळखले.
सोमवारी सकाळी शेगाव शहरातील श्री अग्रसेन चौक येथील दार्जीलिंग चहाच्या दुकानासमोर एका इसमाचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आल्याने दुकान मालकाने याबाबतची माहिती शेगाव शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच ठाणेदार अनिल गोपाळ यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह असलेल्या घटनास्थळाचा पंचनामा केला.
यावेळी पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवीत परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने एका युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आपण मृतकाला बिडी आणि पाणी मागितले, मात्र त्याने आपल्याला दिले नाही म्हणून आपणच त्याला दगडाने ठेचून ठार केले असल्याची कबुली दिली.
दुसरीकडे राणी नावाच्या श्वानानेही आरोपीला ओळखले. या घटनेत जयवंत देशमुख (रा. तुदगाव जि. अकोला) याचा मृत्यू झाला असून तो काही दिवसांपूर्वी जवळच्याच सत्कार भोजनालय मध्ये कामावर होता अशी माहिती प्राप्त झाली आहे. आरोपीचे नाव संतोष बाळू सरोदे (वय 25, रा. लोणार) असे असल्याचे समजते. शहर पोलीस सध्या तपास करीत आहेत.