मुंबई : महान्यूज लाईव्ह
जळगाव बॅंक निवडणूकीवर भाजपाने बहिष्कार टाकल्याने महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता. २१ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्या होत्या. १० जागांची आज मतमोजणी झाली. यापैकी ९ जागा महाविकास आघाडीकडे आल्या. एक जागेवर भाजपचे आमदार संजय सावकारे हे निवडून आले.
मात्र यातील एका महिला उमेदवाराच्या विजयाची चर्चा या मतमोजणीनंतर खुप रंगली. आधी निवडणूकीतून जाहिर माघार घेतली. त्यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत उमेदवारांबरोबर राहिल्या. त्यानंतर काय चक्र फिरली, एका दिवसात पुन्हा तयारी केली, आणि विजय मिळवला.
ही जबरदस्त राजकीय कुरघोडी करणाऱ्या उमेदवार होत्या जनाबाई महाजन. रावेर सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार अरुण पाटील यांच्यासाठी त्यांनी जाहिर माघार घेतली. मात्र तोपर्यंत अर्ज मागे घेण्याचा दिवस निघून गेला असल्याने अर्ज तसाच होता. त्यानंतर त्या सतत अरुण पाटलांसोबतच प्रचार करीत होत्या. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी पुन्हा रिंगणात उडी घेतली. त्यांना ५४ पैकी २६ मते तर अरुण पाटील यांना २५ मते पडली. ३ मते बाद झाली. अवघ्या एका मताने जनाबाई महाजन निवडून आल्या.
त्यांच्या या राजकीय कुरघोडीची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.