बारामती : महान्यूज लाईव्ह
ओळखा पाहू कोण ?
कोण होतास तु ? काय झालास तु ?
महेश किसन मोतेवार याचा १७ नोव्हेंबर रोजी बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये काढलेला हा फोटो आहे. बीड शहर पोलिसांनी त्याला अटक करून आणले त्यावेळी काढलेला. अंगावरचे कपडे आणि गोळ्यांची पिशवी याखेरीज त्याच्याकडे काही नव्हते. एखाद्या भिकाऱ्यासारखी त्याची अवस्था होती.
हाच महेश मोतेवार एकेकाळी हेलिकॉप्टरशिवाय फिरत नव्हता. समृद्ध जीवन फाऊंडेशन मल्टीस्टेटचा संस्थापक, मी मराठी चॅनेलचा चेअरमन, मोठमोठ्या राजकीय नेत्यांबरोबरची उठबस असलेला हा माणूस.
सर्वसामान्यांची आकर्षक व्याजदर, साखळी बिझनेस, शेळ्या, मेंढ्या, गाई, कोंबड्या असे आमिष दाखवून फसवणूक करणारे, आणि अफाट पैशाच्या जीवावर सगळ काही रेटून नेऊ अशा भ्रमात राहणाऱ्या सर्वांनी या मोतेवारच्या उदाहरणावरून धडा घेण्याची गरज आहे.
काळ इथेच सर्व पापांची फळे देतो, आणि जोपर्यंत तुमच्याकडे पैसे आहेत तोपर्यंत सगळ जग मुंगळे होऊन तुम्हाला चिकटून राहत. याच मोतेवारने राज्यातील अनेक नेत्यांना फंडिगदेखील केलेले होते. तो आज तुरुंगाची हवा खात आहे. २२ राज्यात त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. एका राज्यात जामीन झाला की दुसऱ्या ठिकाणचे पोलीस उचलतात ही परिस्थिती आहे. एकेकाळी मोतेवार काय काय करत होता. देशभरात एकाच दिवशी रक्तदान शिबीर घेत होता, त्याला भेटण्यासाठी राजकीय नेते, प्रतिष्ठित व्यावसायिक रांगा लावत होते. मात्र आज त्याच्याबरोबर कोणीही नाही.
काहीही करून श्रीमंत होण्याची स्वप्न बघणाऱ्यांसाठी हा धडा आहे.