बारामती : महान्यूज लाईव्ह
रामायणानूसार रावणाने पुष्पक विमानातून सीतेचे हरण केले, आणि रामही वनवास संपल्यानंतर याच पुष्पक विमानातून अयोद्धेला परत आले. ही केवळ पुराणातील वांगी आहेत आणि त्याला सत्याचा काही आधार नाही असे समजणारे लाखो लोक या जगात आहेत.
मात्र आता श्रीलंका सरकारचा पुरातत्व विभाग यामागील सत्यता शोधण्याकामी लागला आहे. रावण हा खरोखरच होता, तो श्रीलंकेचा राजा होता आणि त्याच्याकडे पुष्पक विमानही होते हे श्रीलंकेच्या सरकारला सिद्ध करायचे आहे. दोन वर्षापूर्वी कोलंबोमध्ये नागरी हवाई तन्ज्ञ, इतिहासकार, पुरातत्व शास्त्रज्ञ, भूवैज्ञनिक यांची एक परिषद झाली. त्यावेळेस हा शोध घेण्याच्या कल्पनेला जोरदार पाठिंबा मिळाला.
याबाबतचे संशोधन करण्यासाठी श्रीलंका सरकारने पन्नास लाख रुपये निधी मंजुर केला होता. कोविड व त्यानंतर आलेला लॉकडाऊन यामुळे हे संशोधन थांबले होते, पण ते आता पुन्हा सुरु होणार आहे.
श्रीलंकेच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष शशी दाणातुंगे हे या संशोधनाबाबत आशावादी आहेत.
रावण हे फक्त पुराणातील एक पात्र नव्हते तर तो खराखूरा राजा होता. त्याच्याजवळ स्वत:चे विमान व विमानतळही होते याची मला खात्री पटली आहे. अर्थात ही विमाने आजच्या काळात आहेत तशी नसतील, पण श्रीलंका व भारतातल्या काही लोकांना काही अत्यंत प्रगत तंज्ञत्रान अवगत होते हे निश्चित. त्यावर वस्तुनिष्ठ संशोधन होणे गरजेचे आहे.
असेही शशी दाणातुंगे यांचे म्हणणे आहे.
या संशोधनात भारतानेही सहभागी व्हावे अशी श्रीलंका सरकारची इच्छा आहे.
पर्यटन हा प्रमुख व्यवसाय असलेल्या श्रीलंकेला अशा संशोधनातून हाती आलेल्या निष्कर्षाचा मोठा फायदा होणार आहे.