बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोना आणि कोरोना नंतरच्या काळातही गेल्या एक-दीड वर्षात सडकसख्याहारींवर बारामतीत म्हणावी अशी कारवाई झाली नव्हती, पण काल संध्याकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या पथकाने माळावरची देवी, रिंगरोड, नीरा डावा कालवा, आमराई आधी भागांमध्ये धडक कारवाई केली. शहराच्या विविध भागात विनाकारण बसणारी टोळकी आणि सडकसख्याहारींना चांगलाच हिसका दाखवला.
बारामतीत जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे आणि याच वेळी वेगाने चालणाऱ्या गाड्या, फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास देणारी रोडरोमिओंची टोळकी, दारू पिऊन विनाकारण शिवीगाळ व मारहाण करणारी मद्यपी मंडळी यांचा उच्छाद वाढू लागला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी काल संध्याकाळी पोलिसांचा हिसका टपोरीगिरी करणार्यांना दाखवला. बारामतीत अचानक संध्याकाळी पोलिसांच्या या एंट्री मुळे वातावरण चांगलेच गरम झाले.
पोलिसांनी विविध भागात दिसणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे व अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेकांनी चांगलाच धसका घेतला. दरम्यान रस्त्याच्या कडेला बसून टपोरीगिरी करणारे, दारू पिऊन सिगरेट ओढत छेडछाड करणारे यापुढे पोलिसांच्या कारवाईस पात्र ठरतील असा इशारा देऊन, विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.