सणसर : महान्यूज लाईव्ह
किशोर भोईटे
मागील गळीत हंगामामध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना 2393 रुपये दर दिला. त्याच हंगामातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गेटकेन ऊसाला 28O8 रुपये दर दिल्यामुळे उर्वरीत चारशे पंधरा रुपये छत्रपतीच्या मालक असणाऱ्या सभासदास दयावेत. तसेच उत्तर प्रदेशच्या धर्तीवर 10 टक्के साखर उताऱ्यासाठी 3500 रुपये एस ए पी रक्कम छत्रपतीच्या सभासदांना पहिला हप्ता म्हणून द्यावेत. सभासदांना वाटप करण्यात येणारी साखर चांगल्या दर्जाची द्यावी. थकबाकीदार सभासदांच्या येणे असलेल्या जुन्या थकबाकी मुळे काही सभासद कारखान्यास ऊस घालत नाहीत, त्यामुळे अशा जुन्या थकबाकी विषयी तडजोड करावी. या मागण्यांवर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते व त्यांचे सहकारी यांनी छत्रपती कारखान्यासमोर चार दिवसापासून ठिय्या आंदोलन केले होते.
आज (दि. ४ ) कारखान्याच्या वतीने शेतकरी संघटनेच्या मागण्या बाबत येणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा करून होणाऱ्या निर्णयाचा संघटनेस अहवाल दिला जाईल. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची विनंती कारखान्याच्या वतीने करण्यात आलेली विनंती संघटनेने मान्य करत आंदोलन तात्पुरते मागे घेतले.
पांडुरंग रायते, पुणे जिल्हा अध्यक्ष, शेतकरी संघटना
सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना छत्रपती कारखान्याच्या सभासदांपेक्षा चारशे पंधरा रुपये जादा उसदर दिल्याने आम्ही आंदोलन सुरू केले होते. मा. उच्च न्यायालय तसेच साखर आयुक्त यांच्या निर्णयानुसार सभासदांना दिल्या जाणाऱ्या ऊस दरामध्ये तफावत ठेवू नये, असा नियम आहे. कारखान्याने यावर चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले आहे. या आंदोलनास वेगवेगळ्या संघटनांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे आभार.