महान्यूज लाईव्ह
दोन महिला एकमेकींसमोर उभ्या आहेत, आणि चाळणीतून एकमेकींचा चेहरा पाहत आहेत.
डाबर इंडियाच्या करवा चौथच्या जाहिरातीची ही थीम. या जाहिरातीवर घेतल्या गेलेल्या आक्षेपांनंतर डाबरने ही जाहिरात सगळ्या मिडिया प्लॅटफार्मवरून काढून घेतली आहे.
ही जाहिरात अनेकांच्या रोषाला बळी पडली. यातून समलैंगिकतेचा प्रसार केला जातोय असा आक्षेप घेतला गेला. हिंदू धर्माभिमान्यांनी सोशल मिडियावरून या जाहिरातीला ट्रोल करायला सुरुवात केली. अशा जाहिरातींमुळे हिंदूच्या भावना दुखावल्या जातात, अशा जाहिराती केवळ हिंदूच्या सणाच्या वेळेसच का दाखविल्या जातात, असे आक्षेप या जाहिरातीवर घेतले गेले.
मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सोमवारी ही आक्षेपार्ह जाहिरात कंपनीने काढून टाकावी यासाठी राज्याच्या पोलिसप्रमुखांना आदेश दिले असल्याचे सांगितले. जर कंपनीने ही जाहिरात काढून टाकली नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला होता.
“मला वाटत, हा गंभीर प्रकार आहे, अशा प्रकारच्या जाहिराती केवळ हिंदूंच्याच सणांच्या वेळी बनविल्या जातात. दोन समलैंगिक स्त्रिया करवा चौथ साजरा करत असल्याचे या जाहिरातीत दाखवले आहे. भविष्यात ते या जाहिरातीत दोन पुरुष दाखवतील. हे आक्षेपार्ह आहे.” असेही मिश्रा म्हणाले होते.
अखेर डाबरने ही जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेतला. व्टिटरवर याबाबत केलेल्या निवेदनात कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून सर्वांची विनाअट माफी मागितली आहे.
माध्यमातील अनेकांनी ही जाहिरात काढून टाकल्याचे स्वागत केले असले तरी अनेकांनी जबरदस्तीने ही जाहिरात काढून टाकण्याच्या वृत्तीबद्दल खेद व्यक्त केला आहे.