तरूणांनी देशसेवेसाठी सीमेवर जावे,पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मत!
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरवंड येथील दोन वीर जवान सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा वरवंड ग्रामस्थ आणि वर्गमित्रांनी आयोजित केला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे आणि यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार म्हणाले की, शेतक-यांची मुले आजही देशसेवेसाठी आपले प्राण देण्यास तयार असतात, वरवंड येथील ही दोन्ही शेतकऱ्यांची मुले सैन्यदलात देशसेवाकरून आले आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम.!
या दोन वीर जवानांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावातील इतर तरूणांनी ही देशसेवेसाठी सैन्यात
भरती झाले पाहिजे असे मत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी व्यक्त केले.
वरवंड येथील विजयसिंह हनुमानसिंह परदेशी आणि प्रविण भगवान जगताप हे दोन वीर जवान 30 संप्टेबर रोजी सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले आहेत. विजयसिंह परदेशी यांनी जम्मु काश्मिर,गुजरात,पंजाब,उत्तराखंड, पश्चिम बंगाल, नाशिक याठिकाणी काम केले.तर प्रविण जगताप याने जम्मु काश्मिर, मेरठ, मथुरा, अहमदाबाद, उत्तरप्रदेश, झारखंड, लेह लडाख आदी ठिकाणी देशसेवा केली.
सन 2004 ते 2021 असे तब्बल 17 वर्षे त्यांनी सैन्यदलात देशसेवा केली आहे. हे दोन्ही जवान सेवानिवृत्ती झाल्याने वरवंड ग्रामस्थ आणि वर्गमित्रांकडून नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे रविवारी (दि.10) ग्रामपंचायत कार्यालया समोर आयोजित केला होता. यावेळी ग्रामस्थांनी विजयसिंह परदेशी आणि प्रविण जगताप यांची ग्रामदैवत श्री.गोपीनाथ महाराज मंदीर ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या अतिषबाजीत जंगी मिरवणूक काढली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि उपस्थित ग्रामस्थांनी विजयसिंह परदेशी आणि प्रविण जगताप यांचा आणि या दोन्ही जवानांच्या कुटूंबाचा भव्य नागरी सत्कार करून सन्मान केला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक नारायण पवार म्हणाले की, देशसेवा करून आलेल्या जवानांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम ग्रामस्थांनी आयोजित केला हे कौतुकास्पद आहे. सिमेवर शत्रुंशी जवान आणि देशात व नक्षलग्रस्तांची पोलीस हे सातत्याने देशसेवा करताना शहीद होत आहेत. त्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत.
आजच्या तरूणांनी सैन्यात भरती होवून आपले, आपल्या कुटूंबाचे आणि गावाचे नाव मोठे करावे, विजयसिंह परदेशी आणि प्रविण जगताप या दोघांनीही आता गावातील जास्तीत जास्त तरूणांना सैन्यात भरती होण्यासाठी स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन करावे,त्यांना प्रशिक्षण द्यावे, नागरीकांनीही त्यांना सहकार्य करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी विजयसिंह परदेशी म्हणाले की, मी ज्याठिकाणी देशसेवा केली त्याठिकाणी मी माझ्या गावाचे नाव कसे मोठे होईल त्यासाठी प्रयत्न केले. सैन्यदलात आता वकील, डॅाक्टर तसेच महिलांची ही भरती होत आहे. गावातील तरूणांना सैन्यदलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊ. त्यांना काही मदत लागल्यास ती करू असे आश्वासन दिले.
याप्रसंगी सरपंच मिना दिवेकर, माजी प्राचार्य महादेव वाघमारे, माजी सरपंच गोरख दिवेकर, तानाजी दिवेकर, संजय दिवेकर, किशोर पाटील, राजेंद्र देशमुख, दत्तात्रय दिवेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार दत्तात्रय दिवेकर यांनी मानले.