नगर : महान्यूज लाईव्ह
सध्या राज्यात सर्वच तालुक्यांमध्ये दररोज ठराविक वेळी तालुक्याच्या हद्दीच्या लगतच्या भागात वाहतूक पोलिस थांबलेले असतात.. तोच प्रकार शहरांमध्येही दिसतो.. अर्थात विनामास्क असणाऱ्यांवर कारवाई केली जाते. त्याकरीता ५०० रुपये किंवा २५० रुपये पावती फाडली जाते. मात्र कोरोनाच्या काळात कोणाचे रोजगार गेले, तर कोणी अगदी रस्त्यावर आले. कोणाचा खर्च एवढा झाला की, नैराश्यात गेले. कर्जत पोलिसांनीही विनामास्क असणाऱ्यांवर कारवाई केली. मात्र त्यांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक झाले. मग कर्जत पोलिसांनी असे नेमके काय केले असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. त्याचे उत्तर विस्तृतपणे खाली आहे.
कर्जत पोलिसांनी नुकतीच विनामास्क असणाऱ्यांवर कारवाई केली. कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही कारवाई करण्यापूर्वी या परिस्थितीचा अंदाज घेतला व लोकांना पोलिस हे त्यांच्या खिशातला दंड वसूल करणारे न वाटता, त्यांच्या हितासाठी दक्ष आहेत असेच वाटले पाहिजे याकरीता वेगळे काही करण्याची संकल्पना त्यांनी आखली व ती भन्नाट ठरली. पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल व कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार बाळासाहेब यादव, गोवर्धन कदम, बळीराम काकडे, भारत डांगोरे, शकील बेग, नितीन नरोटे यांनी ही कारवाई केली
कर्जतमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे असा इशारा देत कारवाईला सुरवात केली. मात्र ही कारवाई अशी होती की, जे कोणी विनामास्क दिसतील, त्यांची पावती न फाडता, त्यांना पोलिसांनी स्वतःच मास्क वितरीत केले. त्यांना मास्क तर लावले. मात्र काहीतरी शिक्षा नको का? मग पुढील दोन तास त्यांना पोलिसांना मदत करण्यासाठी घेतले. त्यांना सोबत घेऊन कायदा व सुव्यवस्थेसाठी रस्त्यावर राबणाऱ्या पोलिसांच्या कार्यपध्दतीचा अंदाज घेण्यास लावला. दोन तास तेथे काम केल्यानंतर अनेकांनी आम्ही आजवर पोलिस आम्हाला त्रास देतात, जाणीवपूर्वक वसुली करतात अशी भावना होती, मात्र केवळ दोन तासांमध्ये पोलिसांचे काम किती जबाबदारीचे व आजच्या स्थितीत महत्वाचे आहे याची जाणीव झाल्याच्या प्रतिक्रिया या विनामास्क फिरणाऱ्यांनी व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले.