दिल्ली महान्यूज लाईव्ह
लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला ३ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.
आशिष मिश्रा याला अटक करण्यात आल्याची माहिती महानिरीक्षक उपेंद्र अग्रवाल यांनी दिली. आशिष मिश्रा याची अगोदर पोलिसांनी चौकशी केली. मात्र घटनेच्या दिवशीच्या दुपारी अडीच ते साडेतीन या वेळेतील त्याच्या उपस्थितीचा तपशील आशिष देत नव्हता, तसेच पोलिस चौकशीत सहकार्य करीत नव्हता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान या घटनेतील मृतांना उत्तर प्रदेश सरकारने ४५ लाख रुपयांची भरपाई दिली असून घटनेतील फिर्यादींना पूर्ण संरक्षण देणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीदेखील आशिष मिश्रा याला अटक करण्यासाठी दबाव वाढवला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने थेट यासंदर्भात राज्यव्यापी बंद पुकारला होता. आशिष मिश्रा याच्यावर खून, अपघाती मृत्यू, गुन्हेगारी कट, वाहन चालवण्यातील निष्काळजीपणा आदी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या थार गाडीमध्ये काडतुसे कोठून आली याचाही तपास पोलिस करीत आहेत.