पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे सातारा महामार्गावर राजगड पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडलेल्या साडेतीन कोटींचे चरस आणि चरस तस्करामुळे राजगड पोलिस चर्चेत आले. मात्र पुढील तपासासाठी गोव्यात नेलेला आरोपीच पळून गेला असल्याची माहिती मिळत असून या घटनेने खळबळ उडाली आहे. हा तस्कर पोलिसांच्या हाती तुरी देऊन पळाला असून त्याच्या पलायनामागे मोठे रॅकेट असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. हा तस्कर गोव्यामार्गे इतर राज्यात जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. सोमवारी पहाटे हा तस्कर पोलिसांच्या हातून निसटला.
खाजगी ट्रॅव्हल बसमधून गोव्यात तस्करीसाठी ड्रग्स ( चरस ) घेऊन जात असताना पुणे – सातारा महामार्गावर राजगड पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुस्ताकी रज्जाक धुनिया या नेपाळी तस्कराला पकडले होते. त्याच्याकडून ६ किलो ४५३ ग्रॅम ९३ मिलीग्रॅमचे चरस ( ड्रग्स ) पोलिसांनी जप्त केले. त्याची भारतीय बाजारातील किंमतीत ३२ लाख २६ हजार ६१५ रुपये असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची तब्बल साडेतीन कोटी रुपये किंमत आहे. गुरूवारी ८ ऑक्टोबर रोजी खेडशिवापूर टोलनाका येथे पहाटे पावेसहाच्या सुमारास ही कारवाई राजगड पोलिसांनी कारवाई केली होती. या घटनेत दोन तरुणींचाही सहभाग आढळल्याने ओडीसा राज्यातील दोन तरुणींना अटक करण्यात आली.
दरम्यान त्याला पुढील तपासासाठी म्हापसा येथे नेण्यात आले होते. मात्र खासगी हॉटेलमध्ये उतरलेल्या या पथकाच्या हाती तुरी देऊन हा तस्कर निसटला. हा तस्कर खासगी हॉटेलमध्ये पोलिस का घेऊन गेले इथपासून आता प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असून लपोलिसांचे पथक त्याला घेऊन खासगी हॉटेलमध्ये गेले आणि झोपलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हा तस्कर निसटला.