राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील खडकी येथील पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सुर्या लॅाजवर पुणे सायबर शाखेच्या पथकाने छापा टाकून खुलेआम सुरू असलेल्या वे;श्या;व्यवसायावर कारवाई केली. याच लॅाजवर यापुर्वी दोन वेळा स्थानिक गुन्हे शाखेने आणि स्थानिक पोलीसांनी कारवाई केली होती, मात्र तरीही हा अवैध व्यवसाय तेजीत खुलेआम सुरू होता.
दोन वेळा कारवाई होवून या लॅाजवर व्यवसाय कसकाय सुरू होता? हा व्यवसाय कारणारा स्थानिक मुख्य मालकांवर गुन्हा दाखल करून ठोस कारवाई का केली गेली नाही. असे प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहे. दरम्यान, तालुक्यातील काही बड्या राजकीय नेत्यांच्या आशिर्वादामुळेच याठिकाणी खुलेआम वे;श्या;व्यवसाय सुरू असल्याचे पुन्हा एकादा स्पष्ट झाले
आहे.
पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या खडकी येथील सुर्या लॅाजसह काही लॅाजवर खुलेआम व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ढाब्याचे नामांतर करीत सुर्या या नावाने या हॅाटेल आणि लॅाजींग च्या नावाखाली याठिकाणी परप्रांतीय आणि बाहेरील जिल्हयातील महिलांना या लॅाजवर ठेवल्या जात असल्याचे पोलीसांच्या कारवाईत उघड झाले आहे.
भिगवण, इंदापुर, दौंडसह इतर जिल्हयातील ग्राहक याठिकाणी येत असल्याने रात्रंदिवस या लॅाजवर अवैध व्यवसायाचा धंदा तेजीत सुरू होता. स्थानिक राजकीय पदाधिकारी व्यक्तींचा या व्यवसायात असणारी भागीदारी आणि तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांचा असलेला आशिर्वाद त्यामुळे दोन वेळा कारवाई होवून या व्यवसाय पुन्हा सुरू झाला होता.
मिळत असलेल्या माहितीनुसार एका साखर कारखान्याच्या संचालकानी या लॅाजवर हा व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी या संचालकाने भावाला याठिकाणी देखरेखीचे काम दिल्याची चर्चा या परिसरात आहे. या भावाने या ठिकाणी स्थानिक गावगुंडाना ठेवले होते. याठिकाणी ग्राहकांनी मद्यपान करून काही गोंधळ घातला, तर हे गावगुंड ग्राहकांना दमदाटी, शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याची चर्चा आहे.
या हॅाटेल आणि लॅाजवर अनेक वेळा हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. मात्र राजकीय दबावतंत्र वापरून जागेवरच हे प्रकरणे तडजोडीत मिटवली गेली अशी चर्चा या परिसरात आहे. या हॅाटेल, बिअरबार आणि लॅाजवर सुरू असणारा व्यवसाय आणि सातत्याने होणा-या मारामारीच्या घटनामुळे गावची बदनामी होऊनही या संचालकाच्या आणि त्यांच्या भावाच्या गुंडगिरी आणि दहशतीमुळे कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने त्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढली होती.
हा व्यवसाय करणा-या मालकांचे काही नातेवाईक हे पोलीस विभागात अधिकारी असल्याने ही त्यांच्यावर ठोस अशी कारवाई होत नाही. त्यामुळे काल झालेल्या कारवाईतही त्यांना गुन्हा दाखल करताना वगळले गेले असल्याची चर्चा या भागात आहे. पोलीसांनी आतापर्यंत दोन वेळा या हॅाटेल आणि लॅाजवर छापा टाकून कारवाई केली आहे.
मात्र फक्त व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना बळीचा बकरा बनवले आहे. हा व्यवसाय करणारे धनदांडगे मात्र मोकाट फिरत आहेत. या सुर्या लाॅजमुळे कायदा सुव्यवस्था बिघडली जात आहे. पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा. अभिनव देशमुख यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
स्थानिक पोलीसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सुर्या लॅाजचा मुख्य मालक आणि चालक यांची पोलीस तपासात चौकशी करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून त्वरीत अटक करावे, तसेच बबी उर्फ सुर्या हॅाटेल आणि लॅाजींग हे कायमस्वरूपी सील करून ठोस अशी कारवाई करावी अशी मागणी या भागातील सर्वसामान्य नागरीक आणि महिलांकडून होत आहे.