दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील खडकी येथील एटीएम मशीन रोख रक्कमेसह अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटे पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली.
खडकी येथील ग्रामपंचायतीजवळ पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या आणि गाळा नं.1 मधील निळ्या रंगाच्या हिताची कंपनीचे एटीएम आहे. हे मशीन रविवारी ( दि.10) पहाटे चोरट्यांनी रोख रक्कमेसह एटीएम मशीन एका आलिशान गाडीत नेवून पसार झाले आहे. रविवारी अज्ञात चोरट्यांनी या एटीएमचा काचेचा दरवाजा उघडुन आत प्रवेश केला.
त्यानंतर त्यांनी ते मशीन कशाच्यातरी सहाय्याने ओढुन व तोडुन पुर्णपणे उखडून ते मशीन अंधाराचा फायदा घेवुन चारचाकी आलीशान गाडीमध्ये घेवून पसार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या एटीएम मशीन मध्ये सुमारे 1 लाख 50 हजारांची रोख रक्कम होती.
या मशीन ची किंमत 6 लाख 69 हजार 100 रुपये इतकी असून एकूण 8 लाख 19 हजार 100 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरांनी चोरून नेला आहे. याबाबत अनिल भाऊसाहेब शिंदे ( रा.पारवडी,ता. बारामती,जि.पुणे ) यांनी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दौंड पोलीस या अज्ञात चोरांचा शोध घेत आहेत.