बारामती : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून आयकर खात्याच्या सुरू असलेल्या छाप्याच्या सत्रानंतर काल बारामतीत आलेल्या अजित पवार यांना बारामतीतील महिलांनी सुखद धक्का दिला. बारामतीतील नगर परिषदेच्या वतीने सुरू असलेल्या वृक्षारोपणाच्या वेळी काही महिला रस्त्याच्या बाजूला उभ्या होत्या. त्यांना अजितदादांबरोबर फोटो काढायचा होता. दादांसमवेत फोटो काढताच महिला त्यांना म्हणाल्या, दादा तुमचं काम नंबर एक आहे. दादा आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आमचा तुम्हाला कायम आशिर्वाद आहे. महिलांचे हे उत्तर ऐकताच अजित दादा देखील काही क्षण भावूक झाले.
काल व्यस्त कार्यक्रमातून बारामतीच्या दौऱ्यावर आलेले अजित पवार सकाळी नगर परिषदेच्या वतीने सुरू असलेल्या वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झाले होते. परकाळे बंगल्यानजीक हे वृक्षारोपण सुरू असतानाच रस्त्याच्या पलीकडे परिसरातील काही महिला उभ्या होत्या. त्यांना अजित पवार यांच्यासमवेत एक छायाचित्र घ्यायचे होते. मात्र कोणाला सांगायचे असा विचार करत त्या थांबल्या.
एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला त्यांनी हे विचारल्यानंतर प्रतिनिधीने थेट अजित दादांना ही गोष्ट सांगितली. अजितदादा बाजूला आले आणि त्यांनी त्या महिलांसोबत एक फोटो काढला. फोटो काढल्यानंतर महिलांनी त्यांच्याशी संवाद साधत, दादा, तुम्ही खूप काम करत आहात. तुमचं काम एक नंबर आहे. आम्ही कायम तुमच्या बरोबर आहोत. आमच्या आशीर्वाद तुमच्या कायम आहेत असे या ज्येष्ठ महिलांनी सांगितले. त्यानंतर अजितदादा त्यांना हात जोडून म्हणाले की, तुम्ही मला प्रचंड मतांनी निवडून देता. म्हणून मला काम करावेच लागते. असे म्हणाले आणि ते काही वेळ भावूक झाले.