अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
उत्तर प्रदेश मधील लखीमपुर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना चिरडले. याच्या निषेधार्थ राज्यातील महा विकास आघाडीने उद्या म्हणजे 11 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय महाराष्ट्र बंदचे आयोजन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद सेवा बंद राहणार असून खुद्द राज्य सरकारने हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रातील भाजपा सरकारने तयार केलेले काळे कृषी कायदे रद्द करण्यात यावे यासाठी शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. आंदोलनाचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना लखीमपूर खेरी येथे येण्यास शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने विरोध केला.
शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणावरून माघारी निघाले असता पायी चाललेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर पाठीमागून आलिशान गाड्यांच्या ताफा घालून क्रूरपणे शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. केंद्रातील भाजपा सरकार व उत्तर प्रदेश भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडी आणि शेतकरी बचाव कृती समिती व मित्र पक्ष संघटना यांच्या वतीने सोमवारी 11ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
या बंदच्या निमित्ताने महा विकास आघाडीच्या सरकारने काही मागण्या केल्या आहेत. लखीमपुर खेटी येथील मुख्य आरोपींवर जलदगतीने कठोर कारवाई व्हावी. शेतकरी बांधवांच्या मागणीप्रमाणे त्वरित काळे कृषी कायदे रद्द करण्यात यावेत. व्यवसाय बंद ठेवून शेतकरी बांधवांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध निषेध प्रकट करून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे . महाविकास आघाडी सरकार बरोबरच शेतकरी बचाव कृती समिती, आम आदमी पार्टी, राष्ट्रसेवा दल, लोकायत, मराठा सेवा संघ बंदमध्ये सहाभागी होणार आहेत.