माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर येथील भोरेश्वर मेडिकल या दुकानावरती उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या पथकाने काल कारवाई केली. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसताना झोपेच्या गोळ्यांची अवैध दराने विक्री केली असून या गोळ्या नेमक्या कशासाठी दिल्या जात आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भोरेश्वर मेडिकल मधील व्यक्ती डॉक्टरांची चिठ्ठी नसताना देखील लोकांना झोपेच्या गोळ्या वाढीव दराने विकत असल्याचे दिसून आले होते. पंधरा गोळ्यांचे पाकीट ९३ रुपयांना असताना प्रत्यक्षात ते पाकीट ५०० रुपयांना विकले जात असल्याची माहिती मिळाली.
पुण्याच्या अन्न व औषध प्रशासनाने निरीक्षक अतीश सरकाळे, विजय नागरे यांना सूचना दिली होती. त्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्यासमवेत अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षकांनी येऊन भोरेश्वर मेडिकल वर छापा टाकला. यावेळी चेतन नंदकुमार विसापूर (रा. भोर) ही व्यक्ती डॉक्टरांची चिठ्ठी नसताना लोकांना झोपेच्या, नशेच्या १५ गोळ्या ५०० रुपयांना विकत असताना आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
दरम्यान या गोळ्या व्यसनासाठी पुरवल्या जात आहेत का याचाही संशय अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे पोलिसांना असून पुढील चौकशी अन्न व औषध प्रशासनाकडून केली जात आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली या कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या समवेत श्रीकांत वडणे, सोमेश राऊत, पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, फौजदार श्री सांगळे यांच्या पथकाने भाग घेतला.