खंडाळा : महान्यूज लाईव्ह
फलटणच्या तहसील कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटर अमोल दिलीप जठार याने शेतकऱ्याच्या शेतामध्ये रेशीम शेतीसाठी शेड उभारणीसाठी शासनाकडून आलेले अनुदान खात्यावर जमा केले म्हणून दारू आणि जेवण मागितले. तब्बल 610 रुपये दारू आणि जेवणासाठी स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जठार याला रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार तक्रारदाराची वडिलोपार्जित शेतजमीन फलटण तालुक्यात आहे. या शेतजमिनी मध्ये रेशीम उद्योगाची योजना तक्रारदार शेतकऱ्याने आखली होती. त्यासाठी आवश्यक असणार्या शेड उभारणीसाठी शासनाकडून अनुदान मिळते. ते अनुदान तक्रारदार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करायचे होते. ते वर्ग केल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून जठार याने जेवण आणि दारू मागितले.
यामुळे वैतागलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सातारा युनिटची भेट घेतली. यासंदर्भात पडताळणी केली असता तक्रारदार शेतकऱ्यास संबंधित डेटा एंट्री ऑपरेटर जठार हा जेवण आणि दारू मागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे फलटणच्या तालुका कृषी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी 610 रुपये घेताना जठार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
या कारवाईत पुण्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अशोक शेळके, सचिन राऊत, विनोद राजे, तुषार भोसले, निलेश येवले यांच्या पथकाने भाग घेतला.