सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
निमगाव केतकी येथे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्री.केतकेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा चालू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यांवर आनंद आणि उत्साह दिसत होता.
विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी घेऊन चांगल्या प्रकारचा अभ्यास करून आपल्या आई- वडिलांचे तसेच शाळेचे नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा भरणे यांनी दिल्या.. कोरोना मुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा दोन वर्षे पूर्णपणे बंद होत्या. परंतु अलीकडे कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्यामुळे राज्य सरकारने पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला.
शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद आणि उत्साह जाणवला. मंत्री आपल्याबरोबर मनमोकळेपणाने बोलत असताना विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यावेळी सरपंच प्रविण डोंगरे व निमगाव केतकी तील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.