अमोल होरणे : महान्युज लाईव्ह :
नगर : पावसामुळे कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विभागाला अपयश आले आहे. त्यात गेल्या 20 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
काल रात्री( ता.6) 1.30 च्या सुमारास एक मोठा टॅंकर या महामार्गावरून प्रवास करत असतांना भुतेटाकळी गावाच्या नजीक ड्रायव्हरला रस्त्यातील खड्यात असलेल्या पाण्याचा अंदाज आला नाही, अन त्या ठिकाणी तो टॅंकर पलटी झाला. दैव बलवत्तर म्हणून काही जीवित हानी झाली नाही. ग्रामस्थांनी आणि युवकांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढले.
गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे हा खरेच महामार्ग आहे का, अशी शंका निर्माण होते. खड्डे आणि वाहतुकीसाठी असुरक्षित रस्ता, यामुळे कल्याण-विशाखापट्टणम महामार्गाच्या कामाच्या दर्जावर कायमच शंका उपस्थित केली जाते.
दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत ती कामे अपूर्ण राहिल्यामुळे या मार्गावर पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास ‘एनएचएआय’ला जबाबदार धरण्यात येईल का ?असा प्रश्न या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना पडला आहे .
देशातील प्रमुख महामार्गात या महामार्गाची गणना होते. अहोरात्र वाहनांची वर्दळ असते. डांबरी असलेल्या या महामार्गावर पावसाळ्याच्या दिवसात मोठाले खड्डे पडले आहेत. एक किलोमीटर अंतरातील खड्डे मोजतानाही कुणाचीही दमछाक होईल, अशी अवस्था या महामार्गाची झाली आहे. भुतेटाकळी ते टाकळी फाटा हा रस्ता तर खूपच भयावह झाला आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष-
कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतला नाही. रस्त्यावरून नेहमी आपल्या आलिशान वाहनातून आमदार, खासदार जात असतात. परंतु त्यांना या रस्त्यावरील खड्डे दिसत नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. लोकप्रतिनिधींना, अधिकारी वर्गाला वारंवार सांगूनही काडीचाही बदल होत नाही किंवा उपयोग होत नाही. असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.