बारामती ::महान्यूज लाईव्ह
निमित्त बजरंग खरमाटे यांचे होतं; पण भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बारामतीत पवार कुटुंबियांवरच नेम धरला. जरंडेश्वर साखर कारखान्याची पाहणी करून आलेल्या सोमय्या यांनी जरंडेश्वरचा खरा मालक कोण अजित पवार यांनी सांगावे! असा हेका धरला.
आज दुपारी किरीट सोमय्या बारामतीत आले त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पवार कुटुंबीयांवर विशेषता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले. यानंतर त्यांनी बारामतीतील जळोची भागातील बजरंग खरमाटे यांच्या गॅलेक्सी या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बजरंग खरमाटे यांच्या राज्यभरात 42 बेनामी व नातेवाईकांच्या नावाने मालमत्ता असून त्याची मालमत्ता बाजार मूल्यानुसार 743 कोटींचा असल्याचा दावा केला.
बारामतीत सोमय्या म्हणाले, जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जरंडेश्वर शुगर मध्ये रूपांतर होताना तब्बल 17 कंपन्यांमध्ये सातत्याने स्थलांतर होत गेल्याचे दिसते. याचा खरा मालक अजूनही आम्हाला सापडलेला नाही आणि याचे उत्तर फक्त अजित पवार हेच देऊ शकतात. राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार हे प्रश्नांचे उत्तर देण्यापेक्षा लोकांची दिशाभूल करून दुसरीकडे लक्ष वेधू पाहताहेत.
सोमय्या हे ईडीचे प्रवक्ते आहेत असा आरोप केला गेला होता, या प्रश्नावर सोमय्या म्हणाले, ज्यांची भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधून काढली. ते लोक हा भ्रष्टाचार झाला नसल्याचे का सांगू शकत नाहीत? जर त्यांना आम्ही ईडीचे प्रवक्ते आहोत वाटत असेल त्यांनी कोर्टात जावे.